रत्नागिरी: पर्जन्यजल साठवणुकीसाठी हातीसला ग्रामसहभागातून पंधरा हजार लिटरची टाकी

Gramin Varta
105 Views

रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली हातीस ग्रामविकास मंडळाने पावसाचे पाणी साठविण्यासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरून पंधरा हजार लिटरची टाकी उभारली आहे.

केवळ आठ दिवसांत उभ्या राहिलेल्या या टाकीच्या बांधकामाचा प्रारंभ जलवर्धिनी प्रतिष्ठानचे उल्हास परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली समारंभपूर्वक झाला. पीर बाबरशेख मंदिरात झालेल्या या समारंभात बोलताना श्री. परांजपे यांनी पावसाचे पाणी साठविण्याची आवश्यकता आणि उपाय याविषयी माहिती दिली. पाण्याचे विविधांगी उपयोग श्री. परांजपे यांनी विशद केले. शेतीसाठी तसेच पिण्यासाठीही पावसाच्या साठवलेल्या पाण्याचा उपयोग कसा होऊ शकतो, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. गुजरातमध्ये सुरत येथे एका व्यक्तीने दोन लाख लिटरची टाकी उभारली आहे. त्यासाठी त्याला सुमारे १६ लाख रुपये खर्च आला, या टाकीत साठलेले थेट पावसाचे पाणी बाटलीबंद करून त्याने तेथे मेघामृत या नावाने विक्रीचा व्यवसाय २०२१ साली सुरू केला. अवघ्या दोन वर्षांत त्याने त्यासाठी केलेली गुंतवणूक भरून निघाली. थेट पावसाचे पाणी इतर कोणत्याही पाण्यापेक्षा शुद्ध असते. ते पिण्यासाठी उपयुक्त असते. त्यामुळे त्याची विक्रीही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. कोकणात मुबलक पाऊस पडतो. त्यामुळे अशा पद्धतीने पावसाचे पाणी साठवून ते बाटलीबंद करून विकण्याचा व्यवसायही काही तरुण करू शकतील. आज गावागावांमध्येही प्लास्टिकचे बाटलीबंद पाणी सर्वत्र ठेवले जाते. समारंभांमध्ये आणि घरगुती वापरासाठीही बाटल्या वापरल्या जातात. त्याऐवजी स्थानिक स्वरूपातील पावसाचे शुद्ध पाणी दिले गेले तर व्यवसाय वाढेलच, शिवाय त्यातून निर्माण होणारा पैसा गावातच फिरेल. त्यामुळे गावाच्या विकासालाही चालना मिळू शकेल, अशी अपेक्षा श्री. परांजपे यांनी व्यक्त केली.

मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी पिण्याबरोबरच आंब्याच्या बागांना पाण्याची टंचाई कशी भेडसावते हे विशद केले. आंब्याच्या बागा डोंगरावर असल्यामुळे तेथे पाणी नेणे अत्यंत गैरसोयीचे होते. पाण्याअभावी पुरेसे उत्पन्न मिळू शकत नाही. हातीसचा संपूर्ण भाग आंबा बागायतीसाठीच प्रसिद्ध आहे. डोंगरावरच टाक्या बांधून साठवलेले पावसाचे पाणी डोंगरावरच्या बागांना दिले गेले तर सुरुवातीला काही प्रमाणात खर्च आला तरी नंतरच्या काळात कोणत्याही खर्चाशिवाय बागायतदारांना नव्या कलमांच्या वाढीसाठी तसेच औषधांच्या फवारणीसाठी पाणी मिळू शकते. त्याचा फायदा त्यांनी घेतला पाहिजे. उभारण्यात आलेल्या टाकीमध्ये साठविलेल्या पाण्याचा उपयोगत उरुसाच्या काळात देवस्थानासाठी होणार आहे. या टाकीपासून प्रेरणा घेऊन गावातील आणि परिसरातील लोक पाणी साठविण्यासाठी प्रवृत्ती होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पंचायत समिती सदस्य सौ. कांचन नागवेकर यांनी पावसाचे पाणी साठवण्याची ही कल्पना अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांशी चर्चा करून पाणी साठवण्याकरिता शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात काही देता येईल का, याचा आपण अवश्य विचार करू, अशी ग्वाही त्यांनी समारंभात दिली.

समारंभात पत्रकार प्रमोद कोनकर, भारत शिक्षण मंडळ (पटवर्धन हायस्कूल) संस्थेचे विनायक हातखंबकर, सदस्य संतोष कुष्टे, माजी अध्यक्ष विजय (बबन) नागवेकर, सेक्रेटरी जयवंत नागवेकर, टेंभ्ये हातीस ग्रुप ग्रामपंचायत सदस्या सौ. राधिका राजेंद्र नागवेकर, मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष संदीप (मुन्ना) नागवेकर, महिला बचत गट अध्यक्ष सौ. नीता (नानी) नागवेकर, मंडळाचे विद्यमान पदाधिकारी आणि गावातील तसेच परिसरातील गावांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4630053
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *