‘एक रील शेवटची ठरली’… धबधब्यात पाय घसरून २३ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Gramin Varta
215 Views

रायगड : सोशल मीडियासाठी रील बनवण्याचा मोह एका २३ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील केपी धबधब्यावर घडली आहे. ठाणे येथील अभिषेक कुशवाह (वय २३) हा रील शूट करत असताना पाय घसरून सुमारे ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे ठाणे आणि खोपोली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी अभिषेक आपल्या तीन मित्रांसह रविवारी (२ ऑगस्ट) खोपोलीतील केपी धबधब्यावर गेला होता. दिवसभर फिरल्यानंतर सायंकाळी परतीच्या मार्गावर असताना निसर्गरम्य परिसरात रील बनवण्याचा मोह त्याला आवरला नाही. व्हिडिओ चित्रीकरणात मग्न असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट ४० ते ५० फूट खोल दरीत कोसळला.

अभिषेक दरीत पडल्याचे पाहताच त्याच्या मित्रांनी तातडीने स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस तसेच ‘हेल्प फाउंडेशन’चे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र मुसळधार पाऊस, दरीतील अंधार आणि अवघड भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम मोठ्या अडचणींमध्ये पार पडली.

स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथकाने रात्रभर अथक प्रयत्न सुरू ठेवले. अखेर सोमवारी (३ ऑगस्ट) पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पर्यटकांना आवाहन केले आहे की, धबधबे, कडे आणि निसरड्या ठिकाणी रील किंवा सेल्फी काढण्याचा मोह टाळावा. क्षणिक प्रसिद्धीच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये आणि सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

Total Visitors :
4633113
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *