रत्नागिरी : अवयवदानामुळे गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना नवजीवन मिळू शकत असून एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे तब्बल आठ लोकांना जीवनदान मिळू शकते, त्यामुळे समाजात अवयवदानाविषयी सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे ही काळाची मोठी गरज आहे, असे आवाहन करत सर्व नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करावा आणि जास्तीत जास्त खाजगी रुग्णालयांच्या व्यवस्थापनाने अवयवदानासाठी रजिस्ट्रेशन करावे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात ३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘अंगदान जीवन संजीवनी अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे आणि त्यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत एका विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली जिल्हा रुग्णालय येथून सुरू होऊन आठवडाबाजार मार्गे पुन्हा जिल्हा रुग्णालयापर्यंत काढण्यात आली.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे आणि एनसीडी विभागाचे प्रमुख डॉ. उत्तमराव कांबळे यांनी उपस्थितांना अवयवदानाविषयी सविस्तर माहिती दिली, तसेच याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयवदान करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. या रॅलीमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुण शिरसाट, एनसीडी विभाग प्रमुख डॉ. उत्तमराव कांबळे, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुनिल डोकळे यांच्यासह शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अभियानामुळे जिल्ह्यात अवयवदानाबाबत मोठी जागृती निर्माण होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.





