मंडणगड: आंबेत-म्हाप्रळ खाडीपुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आगामी गणेशोत्सवापूर्वी तो वाहतुकीसाठी खुला करावा आणि इतर प्रलंबित जनहिताच्या मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पांडुरंग गमरे यांनी स्वातंत्र्यदिनी (ता. १५) मंडणगड तहसील कार्यालयासमोर सहकाऱ्यांसह अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील निवेदन मंडणगड तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री, रत्नागिरी व रायगडचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत विविध समस्यांबाबत वारंवार निवेदने देऊन व बैठका होऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला असून, वारंवार होणाऱ्या उपेक्षेमुळे अखेर स्वातंत्र्यदिनीच अन्नत्याग उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नवीन पुलाच्या उभारणीला गती देणे, राष्ट्रीय महामार्ग क्र. ९६५ डीडीच्या दुपदरीकरणातील त्रुटींची चौकशी करणे, मंडणगड शहरातील रस्ते, फुटपाथ, गटारे, पादचारी पूल, चौकांचे रुंदीकरण, पार्किंग, सार्वजनिक शौचालये आणि बाजारपेठेचे योग्य नियोजन करणे या मागण्या करण्यात आल्या आहेत.
तसेच ग्रामीण रुग्णालयात पुरेसे डॉक्टर, तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी, औषध पुरवठा आणि रुग्णवाहिका सेवा तातडीने उपलब्ध करावी, महावितरणचे ‘स्मार्ट वीजमीटर’ रद्द करून जुने पोस्टपेड मीटर कायम ठेवावेत, छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची उभारणी करावी, दुर्गम वाड्या-वस्त्यांना पक्के रस्ते, रेशनधारकांच्या समस्यांचे निवारण आणि पेट्रोल-डिझेलचा सुरळीत पुरवठा करावा, या सर्व मागण्यांवर तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही न झाल्यास १५ ऑगस्टपासून सुरू होणारे हे आंदोलन मागण्या मान्य होईपर्यंत मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.




