शिक्षणाचे धडे अनवाणी; रत्नागिरीतील साठ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षा

Gramin Varta
26 Views

रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन पावणेदोन महिने उलटले तरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील ६० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना अद्याप दुसऱ्या गणवेशाचा निधी मिळालेला नाही. त्यातच बूट व सॉक्ससाठी मंजूर असलेला निधीही न आल्यामुळे ऐन पावसाळ्यात विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा आधार देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधांच्या अंमलबजावणीतील त्रुटी चव्हाट्यावर आल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात पहिल्या गणवेशासाठी मंजूर असलेल्या ३०० रुपयांपैकी केवळ २४० रुपयेच वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित ६० रुपयांसाठी लोकवर्गणी किंवा सीएसआर निधीचा आधार घेण्याचा सल्ला दिल्याने शिक्षक व शाळा व्यवस्थापनावर आर्थिक ताण आला आहे.

दुसऱ्या गणवेशासाठी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील २,९०४, दापोलीतील ६,४६३, खेडमधील ६,०९०, चिपळूणमधील ७,८३४, गुहागरमधील ५,६४८, संगमेश्वरमधील ७,१९३, रत्नागिरीतील १२,१६६, लांजातील ५,०७९ आणि राजापूरमधील ७,०७९ अशा एकूण ६०,४७६ पात्र विद्यार्थ्यांचा निधी अद्याप प्रलंबित आहे. तसेच प्रतिविद्यार्थी १७० रुपयांचा बूट व सॉक्सचा निधीही अजून मिळालेला नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना अनवाणी किंवा तुटक्या चपला घालून शाळेत जावे लागत आहे. शासनाकडून निधी वितरणातील या दिरंगाईमुळे विद्यार्थी मूलभूत लाभांपासून वंचित राहत असून, लवकरात लवकर संपूर्ण निधी वितरित करून विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी पालकवर्गाकडून होत आहे.

Total Visitors :
4656131
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *