राजापुरातील रायपाटण येथेच अप्पर तहसीलदार कार्यालय योग्य; महसूलमंत्री बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण

Gramin Varta
215 Views

राजापूर : प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरीतील जाहीर सभेत रायपाटणचा उल्लेख केल्यानंतर या विषयावरील चर्चेला पुन्हा वेग आला आहे. त्याचवेळी दुसऱ्या एका गावाचाही नाव न घेता उल्लेख करत अंतिम निर्णय पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण  सामंत आणि जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर होईल, असे त्यांनी स्पष्ट केल्याने आता अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भौगोलिक, प्रशासकीय आणि भविष्यातील विकासाच्या निकषांवर रायपाटण हेच अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी सर्वाधिक सक्षम ठिकाण असल्याची भावना राजापूर पूर्व विभागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

रायपाटण येथे पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, समाजकल्याण विभागाचे भव्य वसतिगृह, महाविद्यालय, सरिता जलमापन केंद्र, तालुका क्रीडा संकुल तसेच इंडियन ऑइलचा मोठा पेट्रोल पंप अशा विविध शासकीय व सार्वजनिक सुविधा आधीपासून उपलब्ध आहेत. या सर्व बाबींचा विचार करूनच शासनाने यापूर्वी रायपाटणची अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी निवड केल्याची चर्चा परिसरात आहे.

रायपाटण हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेले गाव असून ‘मंदिरांचे गाव’ म्हणून त्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक गावाला भौगोलिकदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान लाभले आहे. त्यामुळे प्रशासकीय केंद्र म्हणून रायपाटण अधिक सक्षम पर्याय ठरू शकतो, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी अंतिम निर्णयाचा अधिकार पालकमंत्री, स्थानिक आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवल्यानंतर आता रायपाटणच्या सर्व जमेच्या बाजूंचा विचार करून याच ठिकाणी अंतिम शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राजापूर पूर्व विभागात आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.

रायपाटण हे वेगाने विकसित होत असलेले गाव आहे. अर्जुना नदीमुळे गावाचे दोन भाग झाले असले तरी दोन्ही बाजूंना सक्षम रस्ते जाळे विकसित झाले आहे. रायपाटण-सनगरवाडी ते टक्केवाडी-धामणपे तिठा हा सुमारे पाच किलोमीटरचा मार्ग, तसेच बाजारवाडी, गांगणवाडी पूलमार्गे बागवाडी, कदमवाडी आणि खाडेवाडी हे भाग पक्क्या रस्त्यांनी जोडले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात विविध शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक असलेली जागा आणि विस्ताराची संधी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले जाते.
याशिवाय कुपळा परिसरातील वन विभागाची विस्तीर्ण जमीन तसेच गावठाणातील उपलब्ध शासकीय जागा या भविष्यातील प्रशासकीय विकासासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. त्यामुळे कार्यालयीन संकुल उभारण्यासाठी रायपाटण अधिक अनुकूल ठिकाण असल्याचे मत व्यक्त होत आहे.

रायपाटण-टक्केवाडी मार्गावरून परुळे, भांबेड, साखरपा आणि देवरुख या भागांशी थेट संपर्क साधता येतो. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने रायपाटणला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वाढत्या वाहतुकीचा विचार करता पार्किंग, वाहतूक व्यवस्थापन आणि शासकीय कार्यालयांच्या विस्तारासाठी आवश्यक जागाही येथे उपलब्ध असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

भविष्यात रायपाटण-खाडेवाडी ते ताम्हाणे दरम्यान डोंगरातून नवीन रस्ता झाल्यास अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनेक गावे अधिक जवळ येणार आहेत. या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून होत असून तो मार्ग पूर्ण झाल्यास प्रशासकीय सेवा अधिक वेगाने आणि सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहोचू शकतील.
तसेच धामणपे तिठा आणि गांगणवाडीमार्गे बागवे, ओशिवळे, तुळसवडे आदी गावांशी संपर्क अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यातील प्रशासकीय गरजा, दळणवळण, उपलब्ध जागा आणि शासकीय सुविधा या सर्व निकषांवर रायपाटणचे पारडे अधिक जड असल्याची चर्चा सध्या राजापूर पूर्व विभागात रंगली असून, अंतिम निर्णयातही या सर्व बाबींचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4645742
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *