कारवांचीवाडी येथे बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे कुटुंब खचले
रत्नागिरी : शहरालगतच्या कारवांचीवाडी परिसरातील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहताना बुडाल्याने १६ वर्षीय सार्थक सुहास गुरव याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून गुरव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मृत सार्थकच्या आठवणीने त्याची आई अक्षरशः कासावीस झाली आहे. उठता-बसता नजरेसमोर दिसणारा, घरभर बागडणारा मुलगा आज कायमचा निघून गेल्याची जाणीव तिला असह्य होत आहे. “अरे, राजा… माझ्या सोन्या… मला सोडून कुठे गेलास रे तू… एकदा तरी परत ये…” असा तिचा आक्रोश ऐकून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू तरळत होते. आपल्या लेकराची वाट पाहणाऱ्या त्या माऊलीला आता तो पुन्हा कधीच दिसणार नाही, ही वस्तुस्थिती तिच्या मनाला छेद देत आहे. मुलाच्या आठवणीने ती पुन्हापुन्हा हंबरडा फोडत असून संपूर्ण कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.
सार्थकचे कुटुंब मूळचे लांजा येथील आहे. मात्र, नोकरीच्या निमित्ताने ते रत्नागिरी येथे वास्तव्यास होते. कष्ट करून मुलाला शिकवायचे, मोठे करायचे, त्याला आयुष्यात यशस्वी होताना पाहायचे, असे आई-वडिलांचे स्वप्न होते. पण नियतीने क्रूर घाव घालत त्यांच्या सर्व स्वप्नांवर एका क्षणात पाणी फेरले. काळाने असा डाव साधला की, हसते-खेळते घर एका क्षणात दुःखाच्या गर्तेत लोटले गेले.
रविवारी सकाळी सार्थक आपल्या मित्रांसोबत कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक बुडू लागला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत मदतीसाठी हाक मारली. मुलांचा आवाज ऐकताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत सार्थकला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर त्याला उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
सार्थकच्या अकाली जाण्याने गुरव कुटुंबासह नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली असून, एका उमलत्या आयुष्याचा अंत झाल्याची हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे.
‘अरे, राजा, माझ्या सोन्या, कुठे गेलास रे तू….’, मुलाच्या आठवणीने आईचा टाहो
Leave a Comment





