संगमेश्वरच्या सर्व्हिस रोडची दैना; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा वाहन चालकांसह नागरिकांना मनस्ताप

Gramin Varta
87 Views

संगमेश्वर : शहराकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडची पावसाळ्यात अक्षरशः चिखलमय अवस्था झाली असून, या रस्त्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने वाहनचालक आणि नागरिकांना त्रास देण्याचा ठेकाच घेतला आहे का, असा संतप्त सवाल आता प्रवाशांमधून उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण करून तो वाहतुकीस योग्य करून देणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात रस्त्यावर चिखल, माती आणि पाण्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांची अक्षरशः कसरत सुरू आहे.

सर्व्हिस रोडवरून दुचाकी चालवताना वाहन घसरण्याच्या घटना घडत असून, दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मातीमिश्रित चिखलाच्या रस्त्यावरून वाहने हाकताना चाके रुतून वाहने अडकण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी सोयीचा मार्ग राहिला नसून, दररोजची डोकेदुखी बनला आहे.

विशेष म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व्हिस रोडची योग्य स्थितीत दुरुस्ती करून डांबरीकरण करणे ही ठेकेदाराची जबाबदारी होती. मात्र, ही जबाबदारी पार पाडण्यात ठेकेदार सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. नागरिक आणि वाहनचालकांकडून वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने ठेकेदाराच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना ठेकेदाराला कुणाचीही भीती नाही का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी आवाज उठवला जात असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप होत आहे. ठेकेदाराच्या कामावर नजर ठेवणे, दर्जाची तपासणी करणे आणि वेळेत काम पूर्ण करून घेणे ही संबंधित यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यापूर्वी रस्ता व्यवस्थित करून देण्याची साधी अपेक्षाही पूर्ण होत नसेल, तर अशा कामाचा ठेका देऊन उपयोग काय? ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

सर्व्हिस रोड तातडीने वाहतुकीयोग्य करावा, चिखल-मातीचा प्रश्न दूर करून डांबरीकरणाचे काम त्वरित पूर्ण करावे आणि निष्काळजीपणाबाबत संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.

Total Visitors :
4669253
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *