तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकासकेंद्र बनवण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Gramin Varta
7 Views

मुंबई: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना तिसऱ्या मुंबईच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मनसेच्या ‘इंजिन’ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासाचा रोडमॅप समोर ठेवत चोख प्रतिउत्तर दिले.

नवीन विमानतळ, एरो सिटी, मेडिसिटी आणि मोठ्या प्रमाणावरील ग्रोथ हबच्या माध्यमातून तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकासकेंद्र बनवण्याचे नियोजन असून, या भागाच्या विकासातून हजारो-लाखो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ‘सिंदूर महा रक्तदान यात्रा’ नवी दिल्ली येथे पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

“सरकारला तिसऱ्या मुंबईचे काय करायचे हेच माहिती नाही,” अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. याबाबत विचारले असता शिंदे यांनी या टीकेला केवळ राजकीय प्रत्युत्तर न देता सरकारचे प्रत्यक्ष नियोजन समोर ठेवले.

“तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला आहे. तिथे एरो सिटी, मेडिसिटी आणि मोठ्या प्रमाणावर ग्रोथ हब तयार होत आहे. तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन होत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी “काय करायचे हे माहिती नाही” या आरोपाऐवजी “काय करायचे हे ठरले आहे आणि त्यासाठी नियोजन सुरू आहे,” अशी सरकारची भूमिका स्पष्ट केली. राजकीय आरोपाला राजकीय शब्दांनी प्रत्युत्तर देण्याऐवजी विकासाच्या घटकांचा दाखला देणे, हा त्यांच्या उत्तराचा मुख्य संदेश ठरला.

तिसरी मुंबई भविष्यात महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचे नवे केंद्र बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असून, त्यातून रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधांना चालना मिळणार आहे. त्यामुळे एका बाजूला तिसऱ्या मुंबईच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित होत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे ‘ग्रोथ इंजिन’ प्रत्यक्ष विकासाच्या दिशेने पुढे जात असल्याचे चित्र शिंदे यांच्या वक्तव्यातून समोर आले.

या विकासामुळे विमान वाहतूक, आरोग्यसेवा, उद्योग, सेवा क्षेत्र आणि आधुनिक पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः नव्या विमानतळाभोवती निर्माण होणारी आर्थिक परिसंस्था या संपूर्ण परिसराच्या विकासाला वेग देईल. त्यामुळे तिसरी मुंबई भविष्यात गुंतवणूक आणि रोजगारासाठी महत्त्वाचे केंद्र ठरू शकते, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली.

तिसऱ्या मुंबईचे नियोजन पद्धतशीर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेशाचा विस्तार होत असताना भविष्यातील नागरी गरजा, वाहतूक, उद्योग आणि सेवा क्षेत्राचा विकास लक्षात घेऊन या भागाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईवरील वाढता ताण कमी करण्यासोबतच नव्या विकासकेंद्राला आकार मिळणार आहे.

या संपूर्ण प्रकल्पाचा सर्वात महत्त्वाचा परिणाम रोजगारनिर्मितीच्या स्वरूपात होणार असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले. एरो सिटी, मेडिसिटी, ग्रोथ हब आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग-सेवा क्षेत्राच्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून, स्थानिक तरुणांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. या विकासातून संपूर्ण परिसराचा आर्थिक कायापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -
Total Visitors :
4670680
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *