सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत आलेल्या ३८ वर्षीय पर्यटकाचा सर्पदंशानंतर वेळेत उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारासाठी सावंतवाडीच्या दिशेने निघालेली रुग्णवाहिका तब्बल अडीच तास आंबोलीतील प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने ही हृदयद्रावक घटना घडली. गंगाधर मरपा (वय ३८, रा. हंपी, कर्नाटक) असे मृत पर्यटकाचे नाव आहे. या घटनेने आंबोलीतील पर्यटन हंगामातील वाहतूक नियोजन आणि आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गंगाधर मरपा हे कुटुंबीयांसह आंबोली धबधबा परिसरात पर्यटनासाठी आले होते. मुख्य धबधब्यालगत असलेल्या अंधाऱ्या भागात असताना त्यांना सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, तेथे आवश्यक उपचारांच्या मर्यादित सुविधा उपलब्ध असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर गंगाधर मरपा यांना घेऊन रुग्णवाहिका सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली. मात्र, आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची प्रचंड गर्दी आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा यामुळे रुग्णवाहिकेचा प्रवास अक्षरशः ठप्प झाला. जीव वाचवण्यासाठी धावणारी रुग्णवाहिका तब्बल अडीच तास वाहतूक कोंडीत अडकून पडली. आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णालयात पोहोचण्यास झालेल्या या विलंबानंतर गंगाधर मरपा यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे आंबोलीतील पर्यटन हंगामात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरवर्षी वर्षा पर्यटनाच्या काळात आंबोलीत मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता प्रशासनाला आधीपासूनच असतानाही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल किंवा इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गाची व्यवस्था का करण्यात आली नाही, असा संतप्त सवाल आता नागरिक आणि पर्यटकांकडून उपस्थित केला जात आहे.
एका पर्यटकाचा सर्पदंशानंतर जीव वाचवण्यासाठी सुरू झालेला प्रवास वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकला आणि अखेर त्याचा जीव गेला. या घटनेने केवळ एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, आंबोलीतील पर्यटन व्यवस्थेतील आपत्कालीन नियोजनाची गंभीर उणीवही समोर आणली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आंबोलीत अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा सक्षम करणे, गर्दीच्या काळात प्रभावी वाहतूक नियंत्रण व्यवस्था उभारणे आणि आपत्कालीन वाहनांसाठी स्वतंत्र ‘इमर्जन्सी कॉरिडॉर’ किंवा पर्यायी मार्ग कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आंबोली धबधब्यावर पर्यटकाला सर्पदंश; रुग्णवाहिका वाहतूक कोंडीत अडीच तास अडकल्याने दुर्दैवी अंत
Leave a Comment






