महाड : महाड-दापोली राज्यमार्गावर कुरळा दिवेकरवाडी येथील वळणावर दोन एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसमधील १४ प्रवाशांसह दोन्ही बसचे चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाडहून मंडणगडच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि मुंबईच्या दिशेने जाणारी एसटी बस कुरळा दिवेकरवाडी येथील वळणावर समोरासमोर धडकल्या. धडक इतकी जोरदार होती की मंडणगडच्या दिशेने जाणारी बस रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली, तर दुसरी बस रस्त्याच्या कडेला घसरली. प्राथमिक माहितीनुसार, वळणावर दोन्ही बसच्या चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अपघातामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी दुसऱ्या एसटी बसची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठा अनर्थ टळला.
महाड-दापोली मार्गावर दोन एसटी बसची समोरासमोर धडक; १४ प्रवाशांसह चालक-वाहक किरकोळ जखमी, मोठा अनर्थ टळला
Leave a Comment





