चिपळूण : वालोपे गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीकिनारी मगरीच्या हल्ल्यात सापडलेल्या आईला प्रसंगावधान राखत धाडसाने मगरीच्या तावडीतून बाहेर काढणाऱ्या १० वर्षीय स्वर्णी भूपेंद्र पवार या चिमुकलीचा जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणतर्फे तिच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. स्वर्णीच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, तिच्या प्रसंगावधानामुळे आईचा जीव वाचला.
गुरुवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी स्वर्णीची आई नंदिनी पवार (३५) या वालोपे येथील गणेश घाटावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्या नदीकिनारी कपडे धुत असताना दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक त्यांच्या पायाला जबड्यात पकडले आणि त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नंदिनी यांनी आरडाओरड करत बचावासाठी एका हाताने दगडाचा आधार घेतला. मात्र मगर त्यांना पाण्यात खेचण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.
यावेळी घटनास्थळी असलेल्या स्वर्णीने कोणताही विचार न करता धाव घेत आईचा हात घट्ट पकडला आणि तिला मगरीच्या तावडीतून बाहेर ओढण्यास सुरुवात केली. आईनेही मगरीशी झुंज देत स्वतःची सुटका करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. आई-मुलीच्या या प्रयत्नांमुळे अखेर नंदिनी पवार यांची मगरीच्या जबड्यातून सुटका झाली. अवघ्या दहा वर्षांच्या स्वर्णीने दाखवलेल्या धाडसामुळे आणि प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
या धाडसी कृतीची दखल घेत जर्नालिस्ट असोसिएशन चिपळूणच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्णीच्या घरी जाऊन तिचे कौतुक केले. असोसिएशनचे अध्यक्ष तथा दैनिक सागरचे पत्रकार सुनील साळवी, कार्याध्यक्ष सतीश कदम, उपाध्यक्ष गजेंद्र खडपे, खजिनदार संतोष पिलके आणि सदस्य ललेश कदम यांनी स्वर्णीचा भेटवस्तू व रोख बक्षीस देऊन सत्कार केला.
यावेळी स्वर्णीने मगरीचा हल्ला नेमका कसा झाला आणि आईला वाचवण्यासाठी तिने कोणत्या पद्धतीने प्रयत्न केले, याचा थरारक अनुभव उपस्थितांना सांगितला. तिच्या धाडसाचे आणि प्रसंगावधानाचे उपस्थितांनी कौतुक करत तिच्या या शौर्याला सलाम केला.
मगरीच्या तावडीतून आईचा जीव वाचवणाऱ्या धाडसी स्वर्णीचा जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे सत्कार
Leave a Comment





