संगमेश्वर : संगमेश्वर शहरातील पैसाफंड हायस्कूलजवळ असलेल्या बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कार्यालयात प्रवेश करत तांबे व अॅल्युमिनियमच्या प्लेटांसह एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्याविरोधात संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी २९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२.०१ ते पहाटे ४.३० वाजण्याच्या दरम्यान पैसाफंड हायस्कूलजवळील बीएसएनएल कार्यालयात घडली. बीएसएनएलमध्ये कनिष्ठ दूरसंचार अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उमेश सदाशिव शिरसाट (वय ४९) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे.
घटनेच्या वेळी शिरसाट हे बीएसएनएल कार्यालयासमोरील महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली झोपले असताना, अज्ञात चोरट्याने बीएसएनएल कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कार्यालयातील बीएसएनएल टॉवरशी संबंधित तांब्याच्या आणि अॅल्युमिनियमच्या प्लेटा चोरून नेल्या.
चोरून नेलेल्या मुद्देमालामध्ये ५ हजार २५० रुपये किमतीची १५ किलो वजनाची कॉपर प्लेट, ८ हजार ४०० रुपये किमतीच्या ४८ कॉपर प्लेटा आणि ६०० रुपये किमतीच्या तीन अॅल्युमिनियम प्लेटा, असा एकूण १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०७/२०२६ नोंद करण्यात आला असून, अज्ञात आरोपीविरोधात संबंधित कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे.
संगमेश्वरात बीएसएनएल कार्यालय फोडून तांब्याच्या प्लेटांसह १४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास
Leave a Comment






