आजपासून एसटी प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; महिला व ज्येष्ठांना सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच

Gramin Varta
288 Views

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आज, १ सप्टेंबर २०२६ पासून महत्त्वाचा बदल लागू करण्यात आला आहे. शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या संबंधित प्रवाशांना आता NCMC कार्डद्वारेच सवलतीचे तिकीट देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांनी प्रवासाच्या वेळी NCMC कार्ड सोबत ठेवणे आवश्यक ठरणार आहे.

एसटी महामंडळाच्या परिपत्रकानुसार, विविध सामाजिक घटकांना शासनाच्या निर्देशानुसार सवलतीच्या दरात प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. या सवलतधारक प्रवाशांसाठी NCMC कार्डची नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया महामंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ई-बिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांची NCMC कार्ड नोंदणी व वितरणासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांच्या NCMC कार्डची नोंदणी व वितरण सुरू असून, त्यानंतर इतर सवलतधारक प्रवाशांसाठीही ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले NCMC कार्ड ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांसाठी १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेताना सवलतीचे तिकीट NCMC कार्डच्या माध्यमातूनच वितरित केले जाणार आहे.

संबंधित प्रवाशांनी NCMC कार्डमध्ये आवश्यक रक्कम Top-up करून ठेवणेही गरजेचे आहे. यासंदर्भातील मानक कार्यप्रणाली (SOP) संबंधित एसटी आगारांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधून NCMC कार्डची नोंदणी व वितरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि कार्डमध्ये आवश्यक रक्कम उपलब्ध ठेवावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

NCMC म्हणजे National Common Mobility Card. भारत सरकारच्या ‘एक देश, एक कार्ड’ या संकल्पनेवर आधारित हे डिजिटल आणि संपर्कविरहित स्मार्ट कार्ड आहे. या कार्डच्या माध्यमातून एसटी बस, महानगरपालिका बस, मेट्रो, लोकल ट्रेन, टोल नाके, पार्किंग तसेच किरकोळ खरेदीसाठीही व्यवहार करता येतो. बस किंवा मेट्रोमध्ये प्रवास करताना कार्ड मशीनवर टॅप करून तिकीट काढता येत असल्याने रोख रक्कम किंवा सुट्या पैशांची गरज भासत नाही.

Total Visitors :
4786580
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *