देवरुख : दारू पिण्यास वडिलांचा विरोध; मुलाने गळफास घेत जीवन संपविले

Gramin Varta
590 Views

देवरुख : दारू पिऊन घरी आलेल्या मुलाला वडिलांनी पुन्हा घराबाहेर जाऊ नको, अशी समज दिली. मात्र वडिलांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून पुन्हा दारू पिण्यासाठी बाहेर गेलेल्या तरुणाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना देवरुख परिसरातील वरची आळी येथे घडली. ओंकार दत्ताराम शिंदे (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओंकारला दारूचे व्यसन होते. काही महिन्यांपूर्वी तो गावाला आला होता. सोमवारी रात्री सुमारे ११ वाजता तो दारू पिऊन घरी परतला. त्यावेळी वडील दत्ताराम शिंदे (वय ५५) यांनी त्याला पुन्हा दारू पिऊ नकोस, तसेच घराबाहेर जाऊ नकोस, अशी समज दिली. मात्र ओंकारने वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.

बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अंगणात ओंकारने गळफास घेतल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्याला गळफास घेण्यासाठी लोखंडी पाइपला बांधलेल्या साडीचा वापर केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

या घटनेचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल सचिन कामेरकर करीत आहेत. ओंकार हा पुढील महिन्यात पुन्हा जहाजावर नोकरीसाठी जाणार होता. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार असून, त्याच्या आत्महत्येमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.

Total Visitors :
4796809
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *