धुरातून वनस्पतींच्या वाढीचे नवे तंत्रज्ञान; देवरुखच्या संशोधकांची आंतरराष्ट्रीय भरारी

Gramin Varta
61 Views

जैवभाराच्या धुरापासून ‘स्मोक वॉटर’ निर्मिती तंत्रज्ञानाला इंग्लंडचे पेटंट

देवरुख : शेती आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आजवर प्रामुख्याने प्रदूषणाचा घटक मानल्या जाणाऱ्या धुरातील जैवसक्रिय घटकांचा उपयोग आता वनस्पतींची वाढ आणि बियांची उगवण सुधारण्यासाठी करण्याचे अभिनव तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. वनस्पतीजन्य कचरा आणि जैवभाराचे नियंत्रित ज्वलन करून त्यातून निर्माण होणाऱ्या धुरातील उपयुक्त जैवसक्रिय घटक पाण्यात प्रभावीपणे मिसळून ‘स्मोक वॉटर’ तयार करण्याच्या या तंत्रज्ञानाला इंग्लंडचे (युनायटेड किंगडम) डिझाइन पेटंट प्राप्त झाले आहे. या संशोधनामुळे देवरुखच्या शिरपेचात आंतरराष्ट्रीय मानाचा तुरा खोवला गेला आहे.

देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप नाईकवाडे आणि सह्याद्रि संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे यांनी या संशोधनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर. के. टी. महाविद्यालय, ठाणे येथील संशोधकांचाही या प्रकल्पात महत्त्वाचा सहभाग आहे. संशोधनातून विकसित झालेले हे तंत्रज्ञान शेती, उद्यानशास्त्र, रोपवाटिका, वनसंवर्धन तसेच वनस्पती संशोधनासाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

वनस्पतींची पाने, तण, पिकांचे अवशेष, टाकाऊ भाग किंवा अन्य कोरडा वनस्पतीजन्य जैवभार नियंत्रित पद्धतीने जाळल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरामध्ये विविध रासायनिक आणि जैवसक्रिय संयुगे तयार होतात. यातील काही संयुगे वनस्पतींच्या जीवनचक्रावर सकारात्मक परिणाम करू शकतात. या धुराला पाण्याच्या संपर्कात आणून त्यातील पाण्यात विरघळणारे जैवसक्रिय घटक पाण्यात मिसळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणाला ‘स्मोक वॉटर’ म्हटले जाते. यामध्ये आढळणाऱ्या कॅरिकिन्ससारख्या धूरजन्य जैवसक्रिय संयुगांमुळे काही वनस्पतींच्या बियांची उगवण वाढण्यास, बीजसुप्तावस्था कमी करण्यास आणि रोपांच्या वाढीस चालना मिळण्यास मदत होऊ शकते.

डॉ. प्रताप नाईकवाडे यांच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामध्ये वनस्पतीजन्य जैवभाराचे नियंत्रित ज्वलन करण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. ज्वलनासाठी आवश्यक हवेचे प्रमाण नियंत्रित करता यावे यासाठी स्वतंत्र इनलेट आणि सुरक्षित झाकणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्वलनातून निर्माण होणारा धूर फिल्टरेशन कक्षातून पुढे नेला जातो. या प्रक्रियेमध्ये राखेचे कण, काजळी आणि इतर अनावश्यक अवशेष कमी करण्यासाठी बदलता येणारे फिल्टर वापरण्यात आले आहेत. त्यानंतर गाळलेला धूर पाण्याच्या पृष्ठभागाखाली सोडण्यात येतो. त्यामुळे धूर आणि पाण्याचा संपर्क वाढतो आणि जैवसक्रिय घटक पाण्यात मिसळण्यास मदत होते.

स्मोक वॉटर तयार करण्यासाठी असलेल्या इनफ्यूजन कक्षामध्ये मोटरवर चालणारी ढवळणी यंत्रणा देण्यात आली आहे. पाण्याचे सातत्याने मिश्रण होत असल्याने धूरजन्य घटक पाण्यात अधिक प्रभावीपणे मिसळले जातात. याशिवाय उपकरणामध्ये रीचार्ज करता येणारा विजेचा स्रोत, मोटर नियंत्रक, तापमान नियंत्रक आणि वेळ नियंत्रक यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्वलनाची प्रक्रिया, तापमान आणि कालावधी नियंत्रित पद्धतीने हाताळता येतो. तयार झालेले स्मोक वॉटर बाहेर काढण्यासाठी स्वतंत्र आउटलेट असून ज्वलनानंतर निर्माण होणारी राख सहजपणे काढता यावी यासाठी ट्रेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रतीक मोरे यांनी सांगितले की, स्मोक वॉटरचा महत्त्वाचा उपयोग काही वनस्पतींच्या बियांची उगवण क्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. काही वनस्पतींच्या बियांमध्ये नैसर्गिक सुप्तावस्था असल्यामुळे अनुकूल वातावरण उपलब्ध असतानाही त्यांचे अंकुरण तातडीने होत नाही. धूरजन्य जैवसक्रिय संयुगांमुळे अशा बियांमधील सुप्तावस्था कमी होऊन अंकुरण प्रक्रियेला चालना मिळू शकते. रोपांची वाढ, वनस्पतींचे पुनरुत्पादन तसेच दुर्मिळ, स्थानिक आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या वनस्पतींच्या बियांची उगवण वाढविण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.

विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे वनस्पतीजन्य कचरा आणि कृषी अवशेषांचा नियंत्रित पद्धतीने उपयोग करता येण्याची शक्यता आहे. उपलब्ध जैवभाराचा वापर करून तुलनेने कमी खर्चात वनस्पतींच्या वाढीस उपयुक्त द्रावण तयार करण्याचा मार्ग या संशोधनातून उपलब्ध झाला आहे. त्यामुळे कृषी संशोधन, रोपवाटिका व्यवस्थापन, उद्यानशास्त्र, वनसंवर्धन आणि जैवविविधता संवर्धनाच्या क्षेत्रात या तंत्रज्ञानाला महत्त्व प्राप्त होऊ शकते.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी या आंतरराष्ट्रीय मानांकनाबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण आणि जैवविविधतेने समृद्ध असलेल्या देवरुख परिसरातून विकसित झालेल्या संशोधनाला इंग्लंडमध्ये डिझाइन पेटंटच्या माध्यमातून मिळालेली मान्यता ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. संशोधनातून निर्माण झालेल्या संकल्पनेचे तंत्रज्ञानामध्ये आणि त्यानंतर बौद्धिक संपदा हक्कामध्ये रूपांतर कसे करता येते, याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्रताप नाईकवाडे यांना यापूर्वी चार पेटंट, तर प्रतीक मोरे यांना एक पेटंट मिळाले आहे. स्मोक वॉटर निर्मितीच्या या अभिनव तंत्रज्ञानाला इंग्लंडचे पेटंट मिळाल्याने देवरुख परिसरातील शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. नाईकवाडे आणि प्रतीक मोरे यांचे उपाध्यक्ष कृष्णकुमार भोसले, कार्यवाह शिरीष फाटक, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच देवरुख परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Total Visitors :
4772387
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *