देवरूख-मार्लेश्वर रस्त्याची दुरवस्था; खड्ड्यांमुळे भाविक, ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त

Gramin Varta
164 Views

देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू श्री क्षेत्र मार्लेश्वरकडे जाणाऱ्या देवरूख-मार्लेश्वर मार्गाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. मुसळधार पाऊस आणि या मार्गावरून सुरू असलेली अवजड वाहनांची वाहतूक यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच मार्लेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मार्लेश्वर तीर्थक्षेत्री दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येत असताना त्यांना खराब रस्त्याचा सामना करावा लागत आहे. मुरादपूर ते मार्लेश्वर या रस्त्याचे डांबरीकरण २०२३ मध्ये करण्यात आले होते. मात्र काही वर्षांतच या मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. मारळ ते कळकदरादरम्यान रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी मार्लेश्वर मार्गावरून अवजड डंपरची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची स्थिती आणखी खराब झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.

आंगवली येथील दिवणमळा परिसरात मोरीजवळ रस्ता खचून मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने जोरदारपणे खड्ड्यात आपटत असून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. निवेखुर्द येथील निंबेरा पुलाजवळ वळणावरही मोठा खड्डा पडला असून या ठिकाणी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

देवरूख-मार्लेश्वर मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. खराब रस्त्यामुळे वाहने घसरण्याची तसेच अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढल्याने वाहनचालकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. वळणांवर झाडीमुळे समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला राज्य शासनाने ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येतात. असे असताना तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रमुख मार्गाची झालेली दुरवस्था ही चिंतेची बाब ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करावी आणि दुतर्फा वाढलेली झाडी हटवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक, भाविक आणि वाहनचालकांकडून होत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Total Visitors :
4750430
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *