चिपळूण : चिपळूण येथे नूतन दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची स्थापना झाल्याने तालुक्याच्या न्यायिक व्यवस्थेत महत्त्वाची भर पडली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते या न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे चिपळूण तालुक्यातील नागरिकांना वरिष्ठ स्तरावरील न्यायालयीन सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाली आहे.
उद्घाटनप्रसंगी बोलताना न्यायमूर्ती माधव जामदार यांनी चिपळूणशी असलेल्या आपल्या जुन्या नात्याला उजाळा दिला. चिपळूण तालुक्यातील एका गावातून सुमारे दीडशे वर्षांपूर्वी त्यांचे पूर्वज पुण्याला गेले होते. त्यांचे वडील न्यायाधीश असल्याने महाराष्ट्रातील विविध भागांत फिरण्याची संधी मिळाली; मात्र चिपळूणशी असलेले नाते कायम राहिले, असे त्यांनी सांगितले. चिपळूणचा सुपुत्र असल्याने येथे दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू झाल्याचा विशेष आनंद असून, एका अर्थाने चिपळूणचे ऋण फेडण्याची संधी मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चिपळूणमध्ये तालुका स्तरावरील संपूर्ण न्यायिक व्यवस्था निर्माण झाली असून, ही सुविधा केवळ शहरातील नागरिकांसाठी नसून तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे, असे न्या. जामदार यांनी नमूद केले. ग्रामीण भागातील नागरिकांना न्यायालयीन कामासाठी प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक गावांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मर्यादित असून काही गावांमध्ये दिवसातून एसटीची एकच फेरी असते. सर्व नागरिकांकडे खासगी वाहने उपलब्ध नसल्याने न्यायालयीन कामासाठी दुसऱ्या ठिकाणी जाणे पक्षकारांसाठी वेळखाऊ आणि खर्चिक ठरू शकते. त्यामुळे न्यायालयीन सुविधांचे विकेंद्रीकरण झाल्याने सामान्य नागरिकांचा प्रवास, वेळ आणि खर्च कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. कोकण ही परशुरामाची भूमी असून, परशुरामांचे धैर्य, धाडस आणि बुद्धिमत्ता यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी सांगितले. कोणताही वाद न्यायालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सामोपचाराने सोडविण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. न्यायालयीन प्रक्रियेवरील वाढता ताण कमी करण्यासाठी मध्यस्थी आणि परस्पर सामंजस्याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत ज्येष्ठ वकिलांनी तरुण वकिलांना याबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन सावंत यांनी केले. चिपळूणमध्ये दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची आवश्यकता, त्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न तसेच या प्रक्रियेत विविध व्यक्ती आणि संस्थांकडून मिळालेले सहकार्य याची माहिती त्यांनी दिली.
या प्रसंगी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विनोद जाधव, चिपळूणचे नवनियुक्त दिवाणी न्यायाधीश गौतम दिवाण, रत्नागिरी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅड. हर्षद भडभडे, चिपळूण तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन सावंत, अॅड. नयना पवार यांच्यासह न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ॲड. नयना पवार यांनी मानले.
चिपळूणमध्ये दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू; न्यायव्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाला मिळाली चालना
Leave a Comment





