गणेशोत्सवापूर्वी चिपळूण रेल्वेची बंद तिकीट खिडकी पुन्हा सुरू होणार

Gramin Varta
46 Views

शहर व गुहागर बाजूच्या प्रवाशांना दिलासा; शौकत मुकादम यांच्या पाहणीनंतर रेल्वे प्रशासनाचे आश्वासन

चिपळूण : चिपळूण रेल्वे स्थानकाच्या शहराच्या बाजूकडील बंद असलेली तिकीट खिडकी गणेशोत्सवापूर्वी पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी १८ ऑगस्ट रोजी चिपळूण रेल्वे स्थानकाला अचानक भेट देऊन बंद तिकीट खिडकीबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली.

शहराच्या बाजूकडील तिकीट खिडकी बंद असल्याने चिपळूण शहर तसेच गुहागर बाजूच्या परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे मुकादम यांनी रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होणार असल्याने ही तिकीट खिडकी तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी रेल्वेचे कमर्शियल सुपरवायझर अधिकारी श्री. खांबे यांनी गणेशोत्सवापूर्वी शहराच्या बाजूकडील तिकीट खिडकी सुरू करून प्रवाशांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने २८ ऑगस्टपासून प्लॅटफॉर्मवर MUTS द्वारे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहितीही दिली. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे.

या वेळी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम, वालोप गावचे माजी सरपंच रविंद्र तांबितकर तसेच रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

Total Visitors :
4724136
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *