हरिनामाच्या गजरात मुरादपूर ते मार्लेश्वर पायी दिंडी उत्साहात

Gramin Varta
9 Views

आमदार शेखर निकम यांचा दिंडीत सहभाग; टाळ-मृदंगाच्या तालावर तरुणांचे नृत्य, महिलांच्या फुगडीने रंगला भक्तिमय सोहळा

देवरुख : श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारचे औचित्य साधून श्रीमत भागवत नाम सांप्रदाय मंडळ, मुरादपूर आणि संगमेश्वर तालुका वारकरी सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने मुरादपूर ते श्री क्षेत्र मार्लेश्वर पायी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषासह हरिनामाचा गजर आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने दिंडीचा संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघाला.

श्री राधाकृष्ण मंदिर, मुरादपूर येथून सकाळी ६ वाजता दिंडीचे प्रस्थान झाले. भगव्या पताका हाती घेत वारकरी, महिला, तरुण आणि आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या गजरात दिंडी श्री क्षेत्र मार्लेश्वरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनीही या पायी दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांसमवेत हरिनामाचा आनंद घेतला. त्यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्या पूजा निकम, पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे, तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रमेश बांडागळे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि भाविकांनी दिंडीत सहभाग नोंदवला. लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे वारकरी आणि भाविकांचा उत्साह आणखी वाढला.

दिंडी श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पोहोचल्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. टाळ-मृदंगाच्या निनादात हरिनामाचा गजर करण्यात आला. यावेळी तरुणांनी टाळ-मृदंगाच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य करत भक्तीचा आनंद व्यक्त केला. वारकरी आणि भाविकांनीही भजनात सहभाग घेतल्याने मार्लेश्वर परिसर भक्तिमय झाला.

दिंडीतील महिलांनी पारंपरिक फुगडी घालत सोहळ्याचा आनंद द्विगुणित केला. एका बाजूला टाळ-मृदंगाचा निनाद, दुसरीकडे हरिनामाचा गजर आणि महिलांच्या फुगड्या यामुळे श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

श्रावणातील पहिल्या सोमवारी निघालेल्या या पायी दिंडीच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाची परंपरा जपण्याबरोबरच धार्मिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेशही देण्यात आला. मुरादपूरपासून श्री क्षेत्र मार्लेश्वरपर्यंत दिंडीच्या मार्गावर हरिनामाचा अखंड गजर सुरू होता. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या भाविकांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

Total Visitors :
4717316
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *