रमेश शिंदे / भडकंबा : संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील ओझरे खिंड येथे रस्त्याला भेगा पडल्याने तसेच संरक्षक भिंत कोसळल्यामुळे अवजड वाहतूक आणि एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे प्रवासी, व्यापारी, मालवाहतूकदार आणि वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून आर्थिक नुकसानही होत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवापूर्वी आंबा घाटातून वाहतूक सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
आंबा घाट हा रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा तसेच व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. घाटातील वाहतूक बंद असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील प्रवासी आणि व्यापारी वर्गाला मोठा फटका बसत आहे. याची दखल घेत आमदार किरण उर्फ भैया सामंत यांनी रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आंबा घाटाची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी येणारा गणेशोत्सव लक्षात घेता आंबा घाटातील वाहतूक सुरू होणे आवश्यक असल्याचे मत आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केले. रात्रीच्या वेळेत अवजड वाहतूक बंद ठेवून दिवसा सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक सुरू करण्याच्या पर्यायावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
मात्र, आंबा घाटातून वाहतूक सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी, बांधकाम विभाग, वाहतूक विभाग, आरटीओ तसेच पोलीस प्रशासन यांच्याकडून रस्त्याची सुरक्षितता तपासल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे वाहनधारक, प्रवासी, व्यापारी आणि मालवाहतूकदारांचे लक्ष लागले आहे.
या पाहणी दौऱ्यात आमदार किरण सामंत, बांधकाम सभापती विलास चाळके, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तहसीलदार, आरटीओ अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी आंबा घाटातून वाहतूक सुरू होण्याच्या आशा पल्लवीत; आमदार किरण सामंतांसह दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Leave a Comment





