पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये गर्दी

Gramin Varta
36 Views

रत्नागिरी: श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील शिवमंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. रत्नागिरी शहरातील तृणबिंदुकेश्वर मंदिर तसेच जवळच्या राजिवडा येथील काशिविश्वेश्वर मंदिर सकाळपासूनच गजबजून गेले.

तृणबिंदुकेश्वर मंदिरात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच संततधार अभिषेक सुरू झाला आहे. तो पूर्ण महिनाभर चालेल. सोमवारनिमित्ताने शिवमंदिरांमध्ये दुधाचा अभिषेक करण्यात आला.

याशिवाय भागेश्वर मंदिर, राजापुरातील धूतपापेश्वर मंदिर, संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील प्रसिद्ध मार्लेश्वर देवस्थानासह गावागावांमधील शिवमंदिरांमध्ये सकाळपासून गर्दी पाहायला मिळाली. सर्वच मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. मार्लेश्वर देवस्थानात आता वेशसंहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. भारतीय संस्कृतीला साजेसा, पूर्ण आणि अंगभर वेश परिधान करूनच मंदिरात यावे, असे ट्रस्टने जाहीर केले आहे. मार्लेश्वरचा धबधबा प्रसिद्ध असल्यामुळे भाविकांबरोबरच पर्यटनाला येणाऱ्यांची संख्याही मोठी असते.

Total Visitors :
4717334
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *