विद्यानंद बापट मारहाण व शिवीगाळ प्रकरण; आरोपी संतोष चव्हाणला एक दिवसाची पोलीस कोठडी

Gramin Varta
81 Views

पुणे: गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांना मारहाण व शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी अटक आरोपी संतोष चव्हाण याला पुणे न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

संतोष शंकर चव्हाण (वय ३२, रा. हनुमाननगर, राऊतवाडी, कोथरूड) असे पोलिस कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत, विद्यानंद सुहास बापट (वय ३७, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही घटना गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास टिळक रस्त्यावर महाराष्ट्र मंडळाजवळच्या महेश नागरी सहकारी बँकेसमोर घडली. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरोधात यापूर्वी कोथरूड पोलिस ठाण्यात सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला, त्याचा उद्देश नेमका काय होता, याचा तपास पोलिस करत आहेत.

या गुन्ह्यात कोथरूड पोलिसांनी आरोपी संतोष चव्हाणला अटक करून न्यायालयात हजर केले. आरोपीने केलेल्या गुन्ह्यामुळे दहीहंडी व गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात काही अनुचित प्रकार घडवून आणण्याचा त्याचा उद्देश होता का, त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे व सरकारी वकिलांनी केली. आरोपी स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाला असून, त्याच्याविरोधात ३५३ (२) कलम लागू होत नाही. उर्वरित कलमे जामीनपात्र असल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील अनिरुद्ध भांडे पाटील, खेताराम सोळंकी, ऋषिकेश कडू यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

Total Visitors :
4808059
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *