महाड : छत्तीसगडहून कन्नूरकडे जाणाऱ्या मंगला एक्स्प्रेसमधील प्रवासादरम्यान अवघ्या १५ दिवसांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ४) वीर रेल्वे स्थानकाजवळ घडली. तापाने आजारी असलेल्या बाळाची प्रवासादरम्यान प्रकृती अचानक खालावली आणि काही वेळातच त्याची हालचाल बंद झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्लारखा हे पत्नी, दोन वर्षांची मुलगी आयफा आणि नवजात बाळ मोहम्मद हसन यांच्यासह २ सप्टेंबर रोजी छत्तीसगडहून कन्नूरच्या दिशेने मंगला एक्स्प्रेसने प्रवासाला निघाले होते. कन्नूर येथे मोटारसायकल मेकॅनिक म्हणून काम करणारे अल्लारखा हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून, त्यांच्या पत्नीचे माहेर छत्तीसगड येथे आहे. मोहम्मद हसनचा जन्मही छत्तीसगडमध्येच झाला होता.
प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळातच बाळाला ताप आला. प्रकृती अस्वस्थ झाल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र उपचारानंतरही बाळाच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. वीर रेल्वे स्थानकाच्या परिसरात गाडी येत असताना बाळाची हालचाल थांबल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
घटनेची माहिती मिळताच सकाळी सुमारे ९ वाजता मंगला एक्स्प्रेस वीर रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. रेल्वे प्रशासनाने तातडीने बाळाला दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजिंक्य जाधव यांनी तपासणी केल्यानंतर मोहम्मद हसन याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अहवालानंतर रेल्वे पोलिस आर. एम. चव्हाण आणि होमगार्ड सिद्धांत मोरे यांच्या माध्यमातून बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगाव येथील रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे मंगला एक्स्प्रेसमधील प्रवाशांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात आली.
कोकण रेल्वे मार्गावर मंगला एक्स्प्रेसमध्ये चिमुकल्याचा अखेरचा प्रवास; अवघ्या १५ दिवसांच्या बाळाने आईच्या कुशीत घेतला अखेरचा श्वास
Leave a Comment





