चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी बामणोलीचे सुदेश गमरे; सचिवपदी सुहास भागडे तर खजिनदारपदी आदिती गुडेकर यांची सर्वानुमते निवड

Gramin Varta
42 Views

चिपळूण: शहरातील पंचायत समिती शेजारील रमाई माता सभागृहात गुरुवारी १० रोजी चिपळूण तालुका सरपंच संघटनेची महत्त्वपूर्ण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. संघटनेच्या पहिल्या कार्यकारिणीची मुदत संपुष्टात आल्याने या विशेष बैठकीत आगामी कार्यकाळासाठी नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली. यामध्ये बामणोली गावचे सरपंच सुदेश गोपाळ गमरे यांची तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली, तर आबीटगावचे सरपंच सुहास भागडे यांची सचिवपदी वर्णी लागली आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष योगेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस तालुक्यातील सरपंचांची मोठी उपस्थिती होती.

या नव्या कार्यकारिणीत संघटनेच्या उपाध्यक्षपदी राघो गणपत आंबवकर आणि सौ. स्नेहा विलास वाजे यांची निवड करण्यात आली आहे. सहसचिवपदाची धुरा सौ. नीता निलेश शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली असून, खजिनदारपदी सौ. आदिती अविनाश गुडेकर यांची तर संघटकपदी चंद्रकांत तांडकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. गायत्री गणेश जोगळे, सौ. नम्रता नितीन मोहिते आणि आत्माराम बाबू बांबाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशा प्रकारे तालुक्याच्या ग्रामीण विकासाला गती देणारी सर्वसमावेशक कार्यकारिणी सभेच्या मंजुरीने गठीत करण्यात आली.

या निवडणूक व विचारविनिमय सभेला माजी अध्यक्ष योगेश शिर्के यांच्यासह माजी सचिव विकास गमरे, माजी सल्लागार सुनील हळदणकर, सौ. तन्वी खेडेकर, महेश आदावडे यांच्यासह अनेक मान्यवर व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. सभेच्या शेवटी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि मान्यवरांनी नूतन अध्यक्ष सुदेश गमरे यांच्यासह संपूर्ण नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील प्रश्न शासनदरबारी प्रभावीपणे मांडून ते तडीस नेण्याचा निर्धार यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Total Visitors :
4837246
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *