गणेशोत्सवासाठी येणाऱ्या जिल्हावासियांची लूट खपवून घेणार नाही
;रेल्वे स्थानकांवरील रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे नियंत्रण; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश

Gramin Varta
32 Views

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आदी शहरांमधून रेल्वेने रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे स्थानकांवरून पुढील प्रवासासाठी रिक्षाचालकांकडून होणारी आर्थिक लूट खपवून घेतली जाणार नाही. काही रिक्षाचालकांकडून प्रवाशांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत, जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिले.

आगामी १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा शांतता समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी तथा शांतता समितीचे अध्यक्ष मनुज जिंदल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेशोत्सव काळातील वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, विसर्जन व्यवस्था, अतिक्रमणे, मोकाट जनावरे तसेच नागरिकांच्या सुरक्षेबाबत विविध महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील रस्त्यांवर मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. तसेच शहरातील फुटपाथ मोकळे करावेत, पकडण्यात आलेल्या जनावरांच्या संवर्धनासाठी योग्य नियोजन करावे, जड व अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत आवश्यक नियोजन करावे आणि ‘नो पार्किंग’सह महत्त्वाचे दिशादर्शक फलक नागरिकांना स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी लावावेत, असे निर्देशही देण्यात आले.

गणेशोत्सव काळात वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणने विशेष खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. गणपती विसर्जन स्थळांवर पुरेशी प्रकाशयोजना, सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बोटींची व्यवस्था उपलब्ध ठेवावी. विसर्जनाचे मार्ग आधीच निश्चित करून त्यानुसार आवश्यक उपाययोजना कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले.

दरम्यान, रत्नागिरी शहरातील रामनाका ते विठ्ठल मंदिर या मार्गावरील अतिक्रमणाचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. फळविक्रेत्यांनी रस्त्यावर गाड्या उभ्या केल्याने तसेच दुचाकींचे बेवारस पार्किंग होत असल्याने पादचारी आणि ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून हा मार्ग मोकळा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रशासनाला दिले.

गणेशोत्सव काळात शांतता समितीच्या सदस्यांशी प्रशासनाचा अधिक प्रभावी समन्वय राहावा, यासाठी सर्व सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्यात यावीत. तसेच आपत्कालीन परिस्थितीत किंवा आवश्यक माहितीची तातडीने देवाणघेवाण करता यावी, यासाठी शांतता समितीचा स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जिंदल यांनी दिल्या.

बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच जिल्हा शांतता समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.

Total Visitors :
4837176
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *