गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी सचिवपदी साईश कदम यांची निवड; अटीतटीच्या लढतीत मारली बाजी

Gramin Varta
47 Views

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : येथील नामांकित गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथे विद्यार्थी सचिव (General Secretary – GS) पदासाठी पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत एम.बी.ए. भाग-१ चा विद्यार्थी कु. साईश कदम याने बाजी मारत विजय संपादन केला. या विजयासह महाविद्यालयाच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या विद्यार्थी सचिवपदाची धुरा आता साईश कदम याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

या निवडणुकीत विद्यार्थी सचिव पदासाठी एम.बी.ए. भाग-१ चा कु. साईश कदम आणि एम.ए. भाग-१ चा कु. अमृत गोरे यांच्यात थेट लढत झाली. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केल्याने ही निवडणूक संपूर्ण महाविद्यालयात उत्सुकतेचा विषय ठरली होती. अखेर मतमोजणीअंती साईश कदम याने प्रतिस्पर्ध्यावर मात करत मानाच्या सचिवपदावर आपले नाव कोरले. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणे, त्यांच्या समस्यांना वाचा फोडणे आणि विविध प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे ही महत्त्वपूर्ण जबाबदारी आता साईश कदम पार पाडणार आहे.

सदर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, उपप्राचार्य डॉ. सीमा कदम, उपप्राचार्य डॉ. अपर्णा कुलकर्णी तसेच उपप्राचार्य व निवडणूक निरीक्षक डॉ. कल्पना आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक आणि शांततेच्या वातावरणात पार पडली. निवडणूक अधिकारी डॉ. आनंद आंबेकर यांच्यासह डॉ. अश्विनी देवस्थळी, श्री. अमोल सहस्रबुद्धे आणि श्री. अंकित सुर्वे यांनी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे हाताळली.

निवडीची अधिकृत घोषणा होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. महाविद्यालयीन प्रशासन, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांकडून नवनिर्वाचित विद्यार्थी सचिव साईश कदम याचे अभिनंदन करण्यात येत असून, पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -
Total Visitors :
4837082
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *