गणेशभक्तांना कोकणात नेणाऱ्या एसटी चालक-वाहकांचे पनवेलमध्ये प्रचंड हाल; निवारा, शौचालय नसल्याने उघड्यावर मुक्काम, पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण

Gramin Varta
119 Views

नवी मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्याच्या विविध भागांतून दाखल झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर मात्र प्रशासकीय अनास्थेमुळे उघड्यावर रात्र काढण्याची नामुष्की ओढवली आहे. मुंबईतील गणेशभक्तांना कोकणात पोहोचवण्यासाठी सांगली, बीडसह इतर जिल्ह्यांतून मागवण्यात आलेल्या सुमारे २६७ बसेस गुरुवारी पनवेलमध्ये दाखल झाल्या. मात्र, पनवेल आगारात पुरेशी जागा नसल्याने या सर्व बसेस नवी मुंबई विमानतळ परिसरातील मोकळ्या रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या. ऐन सणाच्या तोंडावर कर्तव्य बजावण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या या चालक आणि वाहकांसाठी निवार्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

विमानतळ परिसरातील रस्त्यावर उभ्या असलेल्या या कर्मचाऱ्यांना दिवसभर प्राथमिक सुविधांसाठीही झगडावे लागले. सकाळपासून तहानलेल्या कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था नव्हती; अखेर सायंकाळी चारनंतर प्रशासनाकडून पाण्याचे जार पाठवण्यात आले. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे परिसरात एकही मोबाईल टॉयलेट उपलब्ध न केल्याने चालक-वाहकांना नैसर्गिक विधीसाठी लाजेकाजळीने उघड्यावर जावे लागत आहे. रात्रीच्या मुक्कामासाठी मंडप अथवा शेडची कोणतीही सोय नसल्याने कर्मचाऱ्यांना बसमधील अरुंद सीटवर किंवा थेट डांबरी रस्त्यावरच बिछाना टाकून झोपावे लागले. आंघोळ आणि शौचाची सोय नसताना रात्रभर रस्त्यावर जागून काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुरक्षित सेवा कशी द्यायची, असा संतप्त सवाल कर्मचारी करत आहेत.

या सर्व कर्मचाऱ्यांना शुक्रवारी सकाळी बसेस घेऊन तातडीने कुर्ला नेहरू नगर बस आगारात पोहोचायचे असून, तेथून कोकणातील सावंतवाडीसाठी गणेशभक्तांना घेऊन मार्गस्थ व्हायचे आहे. पुरेसा आराम, झोप आणि किमान प्राथमिक सुविधा न मिळाल्याने थकलेल्या अवस्थेत लांब पल्ल्याचा प्रवास करताना कामावर आणि सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होण्याची भीती एका चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवली. दरम्यान, नवी मुंबई विमानतळ परिसरात उभ्या असलेल्या बसेसवरील कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसतील, तर तातडीने संबंधित विभागाशी संपर्क साधून सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जातील, अशी माहिती राज्य परिवहन मंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली आहे. मात्र, ऐन सणाच्या काळात लालपरीच्या सेवकांना अशा अमानुष परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने प्रवाशांमधूनही हळहळ व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4837164
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *