बैलाचा धक्का लागला म्हणून १८ वर्षांच्या लेकाच्या पोटात बापाच्या डोळ्यांदेखत सुरा खुपसला

Gramin Varta
249 Views

जळगाव: सण उत्सवाचा आनंद क्षणात मातीत मिसळून एका हसत्याखेळत्या घराचा आधारस्तंभ बापाच्या डोळ्यांदेखत हिरावून नेल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना पारोळा तालुक्यातील पळासखेडे बु. येथे घडली आहे. बळीराजाच्या लाडक्या बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी बैलाला बैलाचा धक्का लागल्याच्या अगदी क्षुल्लक कारणावरून पेटलेल्या वादात अवघ्या १८ वर्षांच्या मयूर बाळू उर्फ दुर्वास पाटील या कोवळ्या तरुणाची पोटात वारंवार धारदार चाकू खुपसून निर्घृण हत्या करण्यात आली. ऐन सणाच्या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लेकाला वाचवण्यासाठी बापाने आक्रोश केला, मात्र नियतीने वाटेतच त्याचे प्राण तोडले. या मन हेलावून टाकणाऱ्या रक्तरंजित थरारामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोळ्याचा सण असल्याने मयूर हा आपले वडील बाळू पाटील यांच्यासोबत गावातील पारंपरिक पूजा आटोपून अत्यंत उत्साहाने बैलांना घेऊन घराकडे परतत होता. घराच्या दिशेने जात असताना रस्त्यात त्यांच्या बैलाची धडक गावातीलच एका व्यक्तीच्या बैलाशी झाली. ‘माझ्या बैलाला धक्का का मारला?’ यावरून क्षुल्लक बाचाबाची सुरू झाली, मात्र पाहता पाहता या वादाने भीषण रूप धारण केले. गावातील अंकुश नेहरू पाटील, नेहरू परभत पाटील आणि शुभम शालिक पाटील या तिघांनी मयूर पाटील याच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. काही समजण्याच्या आतच आरोपींनी मयूरच्या पोटात थेट धारदार चाकूचे सपासप वार केले. पोटात वर्मी घाव बसल्यामुळे मयूर रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला.

बापाच्या डोळ्यांसमोर घडलेल्या या भीषण हल्ल्यानंतर घटनास्थळी धाव घेतलेल्या ग्रामस्थांनी गंभीर जखमी मयूरला तातडीने पारोळा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, पोटातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आणि प्रकृती अत्यंत चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अधिक उपचारासाठी जळगावला हलवण्यात येत होते. दुर्दैवाने, एरंडोल शहराजवळ पोहोचताच मयूरची प्राणज्योत मालवली. सणाच्या दिवशीच तरुण मुलाचा असा अंत झाल्याने पळासखेडे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव शोकमग्न झाले आहे. घटनेनंतर तिन्ही संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Total Visitors :
4836545
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *