हरतालिका उपवास पद्धत आणि व्रत :सण एकाच दिवशी आल्याने निर्माण झालेल्या गोंधळावर शास्त्रोक्त तोडगा

Gramin Varta
155 Views

पुणे: भाद्रपद महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हरतालिका तृतीया हा सण महिलांसाठी विशेष श्रद्धेचा असतो. यंदा तब्बल १७ वर्षांनंतर हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याचा दुर्मीळ योग जुळून आल्यामुळे उपवास नेमका कसा धरावा आणि तो कधी सोडावा, याविषयी भाविकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपवास एकत्र आल्याने भाविकांनी अजिबात गोंधळून न जाता शास्त्रोक्त नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट करत प्रसिद्ध पंचांगकर्ते मोहन दाते यांनी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.

दाते गुरुजींनी स्पष्ट केले की, हरतालिकेचा उपवास हा अहोरात्र म्हणजेच पूर्ण दिवसभर केला जातो. त्यानुसार हा उपवास १४ सप्टेंबर रोजी करावा आणि दुसऱ्या दिवशी १५ सप्टेंबर रोजी मंगळवारी सकाळी तो सोडावा. ज्या महिला किंवा पुरुषांचा सोळा सोमवारचा उपवास सुरू आहे, त्यांनी १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी हरतालिका पूजा संपन्न झाल्यावर नैवेद्यातील चुरम्याचा केवळ वास घ्यावा. धर्मशास्त्रानुसार चुरम्याचा नुसता वास घेतल्याने सोळा सोमवारचा प्रसाद ग्रहण केल्यासारखे मानले जाऊन तो उपवास सुटतो, तर हरतालिकेचा अहोरात्र उपवास अखंड सुरू राहतो. तसेच ज्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच १५ सप्टेंबरला ऋषिपंचमीचा उपवास करायचा आहे, त्यांनी मंगळवारी सकाळी सर्वप्रथम हरतालिकेची उत्तरपूजा करून मूर्तीचे विसर्जन करावे आणि त्यानंतर भाताच्या एका घासाचा वास घ्यावा. यामुळे हरतालिकेचे पारणे फिटल्याचे मानले जाते आणि त्यानंतर ऋषिपंचमीचा उपवास नेहमीच्या नियमांनुसार पुढे सुरू ठेवता येतो. एकाच वेळी सलग उपवास आल्यास नियमांचे उल्लंघन न होता दोन्ही व्रतांचे पुण्य मिळावे, यासाठी प्रसादाचा वास घेण्याची सोपी आणि शास्त्रोक्त पद्धत त्यांनी सांगितली.

हरतालिका व्रताच्या पूजाविधीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, चौरंगावर अथवा पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर तांदळाची रास घालावी. त्यानंतर हरतालिका माता पार्वती, तिची सखी आणि वाळू अथवा मातीचे शिवलिंग स्थापित करावे. दिवा लावून आचमन आणि पूजेचा संकल्प करावा. त्यानंतर श्री गणेश, हरतालिका देवी आणि महादेवाला जल, पंचामृत आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून हळद-कुंकू, अष्टगंध आणि सुती वस्त्र अथवा कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी. पूजेत बेलपत्र, दुर्वा, आघाडा, तुळशीची पाने, जास्वंद, कण्हेर यासह सोळा प्रकारच्या पत्री अर्पण कराव्यात. देवीला हिरव्या बांगड्या, काळे मणी, फणी आणि सौभाग्याचे साहित्य वाहून फळे, खारीक, बदाम, नारळ आणि ताज्या फळांचा नैवेद्य दाखवावा. शेवटी हरतालिका व्रताची कथा श्रवण करून धूप, दीप दाखवून हरतालिका देवी व शंकराची मनोभावे आरती करावी, असे आवाहनही दाते गुरुजींनी केले आहे.

Total Visitors :
4836573
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *