१८ जूननंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; २ जुलैपर्यंत पावसाचा जोर वाढणार

Gramin Varta
121 Views

मुंबई : राज्यातील नागरिक गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असताना आता दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजानुसार, १८ जूननंतर महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून १८ जून ते २ जुलै या कालावधीत राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर वाढण्याचे संकेत आहेत.

यंदा ६ जून रोजी मान्सूनने तळकोकणात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर त्याच्या पुढील वाटचालीचा वेग मंदावला. गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनची प्रगती जवळपास ठप्प झाली असून त्याची उत्तर सीमा कोकणातील हर्णे आणि मध्य महाराष्ट्रातील सोलापूर परिसरात स्थिरावली आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनच्या प्रवाहावर परिणाम झाला असून त्यामुळे पावसाची गती कमी झाली आहे. अनेक भागांत केवळ वादळी स्वरूपाचा पाऊस पडत असला तरी व्यापक पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि दक्षिण छत्तीसगडच्या काही भागांत मान्सूनची पुढील वाटचाल वेगाने होऊ शकते. महाराष्ट्रात सध्या कोकणात थांबलेला मान्सून पुढील काही दिवसांत मुंबईसह राज्याच्या इतर भागांत दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास पश्चिम किनारपट्टीवरील मान्सून अधिक बळकट होण्यास मदत होते. मात्र २० जूनपर्यंत अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. अफगाणिस्तानकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूनच्या पुढील प्रवासाला गती मिळेल, असेही हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे.

मान्सूनच्या विलंबामुळे राज्यातील अनेक भागांत उष्णता आणि दमट वातावरणाचा त्रास वाढला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी उष्ण व दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नंदूरबार, जळगाव, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज असून ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

सध्या राज्यातील शेतकरी, नागरिक आणि विविध क्षेत्रांतील घटकांचे लक्ष मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले असून १८ जूननंतर पावसाला वेग मिळाल्यास उकाड्यापासून दिलासा मिळण्याबरोबरच खरीप हंगामालाही मोठा आधार मिळणार आहे.

Total Visitors :
4580735
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *