विधान परिषद निवडणुकीत राज्यात उच्चांकी ९९ टक्के मतदान; बंडखोरीमुळे काही जागांवर निकालाची चुरस वाढली

Gramin Varta
112 Views

मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या द्वैवार्षिक आणि पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी झालेल्या मतदानात मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला असून, राज्यातील अकरा मतदारसंघांत एकूण ९९.०२ टक्के इतक्या उच्चांकी मतदानाची नोंद झाली आहे. सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत पार पडलेल्या या प्रक्रियेत एकूण ७,०४७ मतदारांपैकी तब्बल ६,९७८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये भंडारा-गोंदिया मतदारसंघात शंभर टक्के मतदान झाले असून, अमरावती मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच ९४.६८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीतील ६ जागा आधीच बिनविरोध झाल्या असून, उर्वरित ११ जागांसाठीचे हे मतदान पूर्ण झाले असून याचा अंतिम निकाल २२ जूनला जाहीर होणार आहे.

राज्यातील बहुतांश मतदारसंघांत ९८ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे पारडे जड मानले जात असले, तरी नाशिक आणि जळगाव या मतदारसंघांमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे निकालाची चुरस कमालीची वाढली आहे. दुसरीकडे, विरोधी महाविकास आघाडीनेही या निवडणुकीत आम्ही चमत्कार करू शकतो, असा मोठा दावा केल्यामुळे सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघांचा विचार केला तर भंडारा-गोंदियात १००.०० टक्के, सांगली-साताऱ्यात ९९.८९ टक्के, नाशिकमध्ये ९९.८४ टक्के, परभणी-हिंगोलीत ९९.७९ टक्के, नांदेडमध्ये ९९.७८ टक्के, सोलापूरमध्ये ९९.६८ टक्के, धाराशिव-लातूर-बीडमध्ये ९९.४९ टक्के, छ. संभाजीनगर-जालन्यात ९८.९० टक्के, नागपूरमध्ये ९८.४४ टक्के, जळगावात ९७.७८ टक्के आणि अमरावतीत ९४.६८ टक्के मतदान झाले आहे.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *