रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील शासकीय रास्त धान्य दुकानाविरोधात नागरिकांनी सातत्याने केलेल्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने मोठी कारवाई करत संबंधित दुकानाला सीलबंद केले. प्राथमिक तपासणीदरम्यान अनियमिततेची दखल घेत ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कोकणनगर परिसरातील नागरिकांनी बुधवारी सकाळपासून मोठ्या संख्येने रास्त धान्य दुकानासमोर जमून तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून रेशन वेळेवर मिळत नसल्याच्या, धान्याचे अपूर्ण वितरण होत असल्याच्या तसेच ग्राहकांशी अरेरावीची वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात होत्या.
या संदर्भात प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक केतन उमेश शेट्ये आणि नगरसेविका फौजिया तनवीर मुजावर यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर नागरिकांनी दुकानदार सचिन गोठणकर यांच्याविरोधात लेखी तक्रारी सादर केल्या. नागरिकांनी सांगितले की, काहीवेळा केवळ गहू तर काहीवेळा फक्त तांदूळ देण्यात येतो. एका महिन्याचे संपूर्ण रेशन एकाच वेळी न देता वारंवार दुकानात येण्यास भाग पाडले जात असल्याने वेळ आणि आर्थिक खर्च वाढत असून सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुरवठा विभागाने नागरिकांच्या लेखी तक्रारींची नोंद घेत प्राथमिक तपासणी केली. त्यामध्ये आढळलेल्या बाबींची दखल घेत संबंधित रास्त धान्य दुकान तातडीने सीलबंद करण्यात आले. पुढील चौकशीनंतर आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
याबाबत नगरसेवक केतन उमेश शेट्ये यांनी सांगितले की, “सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरू राहील.”
या वेळी पुरवठा विभागाच्या सायली चव्हाण, निशा पाईकराव, काळे सर यांच्यासह विभागातील अधिकारी आणि परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच रेशन वितरण व्यवस्था पारदर्शक व सुरळीत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर कोकणनगर येथील रास्त धान्य दुकान सीलबंद; अनियमिततेची चौकशी सुरू
Leave a Comment







