कोरोनानंतर आणखी एका रोगाची भीती; देशात २४ तासांत आठपट रुग्णवाढ

Gramin Varta
146 Views

नवी दिल्ली : २०२० मध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोरोना संकटातून देश सावरल्यानंतर आता दिल्ली-एनसीआरमध्ये स्वाईन फ्लूने पुन्हा डोके वर काढले आहे. स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, राजधानी दिल्लीतील रुग्णांची संख्या २३०८ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर इन्फ्लूएंझा ए आणि बीच्या रुग्णांची संख्या सुमारे ३००० वर पोहोचल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत गेल्या २४ तासांत तब्बल आठपटीने वाढ झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात केवळ १५ रुग्णांची नोंद होती. मात्र, मंगळवारी नवीन रुग्णांची संख्या वाढत एकूण १२० वर पोहोचली. या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

राजधानी दिल्लीतील मोसमी फ्लू तसेच कीटकजन्य आजारांच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत आरोग्यमंत्री डॉ. पंकज कुमार सिंह यांनी आंतरविभागीय आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. यावर्षी H1N1 हा स्वाईन फ्लूचा प्रमुख उपप्रकार असल्याचे समोर आले असून, गेल्या वर्षी H3N2 हा उपप्रकार सर्वाधिक प्रचलित होता.

दरम्यान, दिल्लीमध्ये डेंग्यूचे ५७० तर मलेरियाचे २१५ रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे यावर्षी डेंग्यू किंवा मलेरियामुळे एकही मृत्यू झालेला नाही. आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांची तयारी, औषधांचा साठा तसेच चाचणी सुविधांचा आढावा घेतला. केवळ अहवाल आणि आकडेवारीपुरती तयारी मर्यादित न ठेवता त्याचा परिणाम प्रत्यक्ष जमिनीवर दिसला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली-एनसीआरमधील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

स्वाईन फ्लूचा संसर्ग प्रामुख्याने बाधित व्यक्तीच्या खोकताना, शिंकताना किंवा बोलताना हवेत मिसळणाऱ्या सूक्ष्म थेंबांमधून होतो. हे थेंब निरोगी व्यक्तीच्या श्वासावाटे शरीरात गेल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच बाधित व्यक्तीने तोंडाला किंवा नाकाला हात लावल्यानंतर त्याच हाताने दरवाजाचे हँडल, रेलिंग किंवा इतर वस्तूंना स्पर्श केल्यास त्या पृष्ठभागावर विषाणू राहू शकतो. अशा दूषित वस्तूंना स्पर्श केल्यानंतर डोळे, नाक किंवा तोंडाला हात लावल्यासही संसर्ग होण्याची शक्यता असते.

स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत होत असलेली ही झपाट्याने वाढ आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत असून, नागरिकांनी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4760807
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *