नेपाळमध्ये महापुराचा भीषण कहर; १६० मृत, १००० हून अधिक बेपत्ता, १३३ भारतीयांचा समावेश

Gramin Varta
356 Views

काठमांडू : नेपाळ-तिबेट सीमेवर बुधवारी सकाळी निसर्गाने रौद्र रूप धारण केले. भोटे कोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या अचानक महापुरासोबतच भूस्खलन झाल्याने सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. काही मिनिटांतच पाण्याची पातळी तब्बल ३० फुटांपर्यंत वाढल्याने नदीकाठची गावे, जलविद्युत प्रकल्प, रस्ते आणि कैलास-मानसरोवर यात्रेचा मार्ग पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. या आपत्तीत आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून, १३३ भारतीय नागरिकांसह ८४४ हून अधिक व्यक्ती बेपत्ता असल्याने चिंता वाढली आहे.

नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार, देशात १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी तिबेटमधील केरोंग प्रांतात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. बेपत्ता असलेल्या परदेशी नागरिकांची संख्याही मोठी असून, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि मलेशियासह २८ देशांतील नागरिकांचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये १३३ भारतीय नागरिक तसेच ३७ अनिवासी भारतीय असल्याचे समोर आले आहे. पुराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की, घटनास्थळापासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावरील चितवन परिसरातही ३३ मृतदेह आढळून आले आहेत.

या आपत्तीचा सर्वाधिक परिणाम रसुवा जिल्ह्यातील भागांवर झाला आहे. पुराच्या तडाख्यात घरे, वाहने, पूल, रस्ते आणि विविध पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सीमावर्ती भागातील तिमुरे परिसर तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. पुरामुळे अनेक नागरिकांचा संपर्क तुटला असून, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

नैसर्गिक आपत्तीचा फटका नेपाळच्या सुरक्षा यंत्रणांनाही बसला आहे. रसुवा परिसरातील पोलीस आणि सैनिकांचे बॅरेक्स पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने २९ पोलीस कर्मचारी आणि ४४ सैनिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. लंगटांग खोला जलविद्युत प्रकल्पातील कामगार तसेच सीमाशुल्क विभागातील काही अधिकारीही संपर्काबाहेर आहेत. त्यामुळे बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे.

नेपाळचे पंतप्रधान शाह यांनी परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना धीर देण्याचे आवाहन केले आहे. नेपाळी सेना, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाने हेलिकॉप्टर, ड्रोन आणि बोटींच्या सहाय्याने बचाव मोहीम सुरू केली आहे. मात्र, अनेक भागांतील रस्ते वाहून गेल्याने तसेच चिखल आणि प्रतिकूल हवामानामुळे बचावकार्य करताना अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापुरामुळे नेपाळच्या पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे १९ पूल, जवळपास ४० किलोमीटरचे रस्ते, १३ जलविद्युत प्रकल्प आणि २०० पेक्षा अधिक ट्रक पुराच्या प्रवाहात वाहून गेले आहेत. त्यामुळे वाहतूक, वीजपुरवठा आणि दळणवळण व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. सर्वाधिक बाधित भागांना पुढील तीन महिन्यांसाठी आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, जखमी नागरिकांवर मोफत उपचार करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

दरम्यान, कैलास-मानसरोवर यात्रेवर गेलेल्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. पुरामुळे यात्रेचा मार्ग बाधित झाल्याने अनेक यात्रेकरू अडचणीत सापडले आहेत. तिबेटमध्ये पुण्यातील चार यात्रेकरू अडकल्याची माहिती समोर आली असून, त्यापैकी दोन महिलांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना हवाई मार्गाने मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नेपाळमधील या अभूतपूर्व आपत्तीमागे अचानक झालेला अतिवृष्टीचा परिणाम, भूस्खलन किंवा हिमनदीतील तलाव फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, बाधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, या महापुरामुळे निर्माण झालेल्या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने बेपत्ता नागरिकांचा शोध आणि मदतकार्य आणखी वेगाने राबवण्याचे आव्हान नेपाळसमोर उभे राहिले आहे.

Total Visitors :
4767028
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *