राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता

Gramin Varta
29 Views

मुंबई: भारतीय हवामान विभागाने सप्टेंबर महिन्यातील पावसाच्या स्थितीबाबत अंदाज व्यक्त केला असून, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम राहण्याची शक्यता आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, ऑगस्ट महिन्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाची नोंद सरासरीपेक्षा कमी राहिल्याची माहिती हवामान विभागाच्या सुषमा नायर यांनी दिली आहे.

ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात तब्बल ६९ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. विदर्भातही सरासरीच्या तुलनेत ५८ टक्के कमी पाऊस झाला असून, राज्यातील एकूण सरासरी पावसाची तूट ४६ टक्क्यांवर पोहोचली आहे. मुंबईतही ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या तुलनेत ३३ टक्के कमी पाऊस झाला. पाऊस निर्माण करणारी प्रभावी हवामान प्रणाली तयार न झाल्यामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झाला नसल्याचे सुषमा नायर यांनी स्पष्ट केले.

जुलै महिन्यापर्यंत राज्यात पावसाची स्थिती समाधानकारक होती. विशेषतः कोकण किनारपट्टी भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्याचा विचार केला तर काही भागांमध्ये पावसाची स्थिती ठीक असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाची मोठी तूट आहे. ऑगस्ट महिन्यात एक-दोन वेळा हवामान बदलाची शक्यता निर्माण झाली होती; मात्र महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पुरेसा पाऊस पडण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली नाही.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यातील बहुतांश भागात परिस्थिती फारशी बदलण्याची शक्यता नसून, सध्या कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, सध्या एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचवेळी राज्यातील इतर भागांमध्ये पावसाची स्थिती तुलनेने कमीच राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यातही बहुतांश जिल्ह्यांतील पावसाची तूट कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Total Visitors :
4789426
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *