रत्नागिरी : एटीएम केंद्रात मदत करण्याच्या बहाण्याने एका महिलेचे एटीएम कार्ड बदलून तिच्या बँक खात्यातून ५० हजार रुपये काढून तसेच कार्डद्वारे ७ हजार ७०० रुपयांची खरेदी करून एकूण ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना रत्नागिरी शहरात समोर आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात सुरतमधील एका व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विश्वनगर, इंद्रधन अपार्टमेंट येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्रात घडली. याप्रकरणी स्मृतिका संजय पाटोळे (वय ५८, रा. उद्यमनगर रोड, रत्नागिरी) यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी स्मृतिका पाटोळे या एटीएममधून व्यवहार करण्यासाठी गेल्या असता आरोपी धिरजकुमार मोहनलाल पांचाळ (वय ४१, रा. सदगुरू अपार्टमेंट, सुरत सिटी, गुजरात) याने त्यांचे एटीएम कार्ड काढून घेतले. त्यानंतर त्याऐवजी दुसरे एटीएम कार्ड देऊन फिर्यादी यांची दिशाभूल केली.
यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून एटीएम कार्डच्या माध्यमातून ५० हजार रुपये काढले. तसेच त्याच कार्डचा वापर करून प्रियांका वाईन मार्ट येथे ७ हजार ७०० रुपयांचे पेमेंट केले. अशा प्रकारे आरोपीने एकूण ५७ हजार ७०० रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१६(२), ३१८(२), ३१८(४) अंतर्गत आरोपी धिरजकुमार पांचाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रत्नागिरी शहर पोलिस करत आहेत.
एटीएम कार्ड बदलून रत्नागिरीतील महिलेची ५७ हजार ७०० रुपयांची फसवणूक; सुरतमधील व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
Leave a Comment







