सासूच्या बंद घरावर सुनेचाच हात; दोन लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास

Gramin Varta
335 Views

चिपळूण : कौटुंबिक नातेसंबंधांना तडा देणारी धक्कादायक घटना चिपळूण शहरात उघडकीस आली असून, सासूच्या बंद घरातून सुनेनेच तब्बल दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी सुनेविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पाग कासकरआळी परिसरातील शाबीरा मंझील येथे राहणाऱ्या नईमा रफिक झारे (वय ५९) यांनी याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची सून सानिया फारुख झारे (वय १८) हिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ५ जून रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते १४ जून रोजी दुपारी १ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

फिर्यादीनुसार, नईमा झारे या घरी नसताना संशयित सानिया झारे हिने त्यांच्या परवानगीशिवाय बंद घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूमचा दरवाजा उघडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या ऐवजात ९.१८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि नाकातील सोन्याची पुली असा एकूण २ लाख ८ हजार ९१७ रुपयांचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटना उघडकीस आल्यानंतर नईमा झारे यांनी १६ जून रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच संबंधित कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून अथवा अन्य कोणत्या कारणामुळे हा प्रकार घडला, याचा तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *