देवरुख: नीट परीक्षेतील पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ देवरूख येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मुसळधार पावसात विविध सामाजिक व विद्यार्थी संघटनांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. युयुत्सू आर्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मुसळधार पावसाची जराही तमा न बाळगता आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ अजिबात खपवून घेतला जाणार नाही आणि नीट घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी केली.
भविष्यात असे गैरप्रकार टाळण्यासाठी अत्यंत पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा पद्धत लागू करण्यात यावी या मागणीसाठी आयोजित केलेल्या या आंदोलनात शरदचंद्र गिते, विलास कोळपे, दिलीप बोथले, काशिनाथ वाजे, सुबोध अणेराव, अभिमन्यू शिंदे, भाऊ शिंदे, नितीन लोकम, बंधू बेर्डे, निखिल कोळवणकर, वैभव बुर्शे व आश्विनी बुर्शे यांच्यासह अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा लढा असाच सातत्याने सुरू ठेवण्याचा एकमुखी निर्धार याप्रसंगी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला.




