देवरुखमध्ये पोलिसांची धडक कारवाई; नियमबाह्य पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर गुन्हे दाखल

Gramin Varta
392 Views

देवरुख : देवरुख पोलीस आणि साखरपा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत पोलिसांनी केलेल्या विशेष मोहिमेत नियमबाह्य पद्धतीने जनावरांची वाहतूक करणाऱ्या तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागवल्याप्रकरणी आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ आणि १४ जुलै रोजी साखरपा तळवाडी आणि सह्याद्रीनगर तिठा परिसरात पोलिसांनी संशयास्पद वाहनांची तपासणी केली. यावेळी महिंद्रा बोलेरो पिकअप गाड्यांमधून बैलांची आणि म्हशींची वाहतूक केली जात असल्याचे समोर आले. आरोपींनी या जनावरांना मानेला आखूड दोरीने बांधून, हालचाल करता येणार नाही अशा पद्धतीने दाटीवाटीने कोंबले होते. विशेष म्हणजे, या वाहनांमध्ये जनावरांसाठी हवा खेळती राहण्याची व्यवस्था नव्हती, तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती.
वाहनांमध्ये जनावरांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले पार्टीशन नसणे, प्रथमोपचार कीटचा अभाव, वाहतुकीचे प्रमाणपत्र नसणे आणि वाहनांवर जनावरे वाहतुकीचा फलक न लावणे अशा गंभीर त्रुटी पोलिसांना आढळून आल्या. यापैकी एका प्रकरणात तर एक म्हैस जखमी अवस्थेत असतानाही तिची वाहतूक केली जात होती. तसेच, काही चालकांकडे वाहन चालवण्याचा वैध परवानाही नव्हता.

देवरुख पोलीस ठाण्याचे संजय करांडे, मनस्वी पावसकर आणि गणेश सुतार यांच्यासह पोलीस पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी नितिन गंगाराम चव्हाण, रोहन अंकुश साळुंखे, गणेश गणपत लांबोरे, संतोष राजाराम गजचार आणि संतोष सखाराम जांगली या आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा आणि मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे जनावरांची तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *