दापोली : विहिरीत कोसळलेल्या भेकराला वन विभागाच्या तत्परतेने मिळाले ‘जीवदान’

Gramin Varta
378 Views

दापोली: दापोली तालुक्यातील खेर्डी-माळवाडी येथे शेतातील विहिरीत चुकून पडलेल्या एका भेकराला वन विभागाने स्थानिकांच्या मदतीने शिताफीने बाहेर काढत जीवदान दिले आहे. विहिरीतून काढल्यानंतर गंभीर जखमी असलेल्या या भेकराला पुढील उपचारांसाठी पुणे येथील अत्याधुनिक रेस्क्यू सेंटरमध्ये हलवण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वन विभागाने सांगितले आहे.

खेर्डी-माळवाडी येथील पांडुरंग केळकर यांच्या शेतातील विहिरीत वन्यप्राणी पडल्याची माहिती मिळताच दापोली वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झाडे आणि वन्यजीवप्रेमी किरण करमरकर यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने दोरखंड आणि जाळ्याच्या साहाय्याने भेकराची सुखरूप सुटका केली. विहिरीत पडताना खडकावर आदळल्याने भेकराच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. पशुधन विकास अधिकारी डॉ. मुकुंद लोंढे यांनी घटनास्थळी प्राथमिक उपचार केल्यानंतर, विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या सूचनेनुसार त्याला पुणे येथील विशेष केंद्रात उपचारासाठी पाठवण्यात आले. वन कर्मचाऱ्यांची तत्परता आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या वन्यजीवाचे प्राण वाचल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *