महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे गुहागरमध्ये गायीचा मृत्यू; निष्काळजीपणाचा ग्रामस्थांकडून तीव्र निषेध

Gramin Varta
81 Views

गुहागर: तालुक्यातील मुंढर ओळवणवाडी परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका निष्पाप गायीचा वीज प्रवाहाच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंढर ओळवणवाडी येथील माळरानावर नेहमीप्रमाणे गुरे चरण्यासाठी सोडली होती. याच दरम्यान तेथून गेलेल्या ११ केव्ही वीज वाहिनीच्या खांबाची गार्ड वायर तुटून जमिनीवर पडली होती. दुर्दैवाने, चरत असताना एक गाय या वायरच्या संपर्कात आली. वायरमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने गायीला तीव्र विजेचा झटका बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

पोलचा देखभाल दुरुस्तीचा अभाव आणि तुटलेली वायर दुरुस्त करण्याबाबत महावितरणने दाखवलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार सूचना देऊनही वीज वितरण कंपनीकडून योग्य खबरदारी घेतली जात नसल्याने असा धोकादायक प्रकार घडल्याची चर्चा परिसरात आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, महावितरणने याची तातडीने दखल घ्यावी आणि पीडित शेतकऱ्याला योग्य आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *