कोकणातील कलगी तुरा आणि नमन लोककलेला शासनाचे अनुदान; कलावंतांकडून मंत्री आशिष शेलार यांचे आभार

Gramin Varta
398 Views

मुंबई/ उदय दणदणे: कोकणच्या मातीतील पारंपरिक लोककला असलेल्या ‘कलगी तुरा’ (जाखडी) आणि ‘नमन’ या कला प्रकारांना राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विशेष अनुदान जाहीर केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोकणातील या प्राचीन कला प्रकारांना बळकटी मिळणार असून, कलावंतांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १३ जुलै २०२६ रोजी वांद्रे, मुंबई येथे कलगी तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई आणि नमन लोककला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आशिष शेलार यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान कलावंतांच्या शिष्टमंडळाने मंत्री शेलार यांचे विशेष आभार मानले. या वेळी मंत्री शेलार यांनी कलगी तुरा आणि नमन लोककलावंतांच्या समस्या जाणून घेत, त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कोकणाची सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवण्यासाठी या कला प्रकारांचे जतन करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे लोप पावत चाललेल्या लोककलांना पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळणार असून, ग्रामीण भागातील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळणार असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कोकणच्या संस्कृतीचे जतन करण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल अत्यंत मोलाचे ठरले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *