मंडणगड: सावित्री नदीतील बार्जेसच्या निष्काळजीपणामुळे म्हाप्रळ-आंबेत पुलाचे नुकसान; बार्ज मालकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
134 Views

मंडणगड : अतिवृष्टीचा इशारा असतानाही सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे सावित्री नदीतील तीन बार्जेस वाहून जाऊन म्हाप्रळ-आंबेत पुलावर आदळल्याची गंभीर घटना ६ जुलै रोजी घडली. या अपघातात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण केल्याप्रकरणी बार्ज मालकावर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशाद अहमद मुजावर (रा. बांद्रा, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या बार्ज मालकाचे नाव आहे.

सावित्री नदीपात्रात सापे (ता. महाड) येथील सर्व्हे क्रमांक ३९/२ जवळ ‘एमव्ही अल सुभानी’, ‘एमव्ही दुलदुल’ आणि ‘एमव्ही झोया’ या तीन बार्जेस नांगरून ठेवण्यात आल्या होत्या. ६ जुलै रोजी हवामान विभागाने रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला असतानाही, बार्ज मालकाने सुरक्षिततेचे कोणतेही ठोस उपाय केले नव्हते. बोटींना बांधलेल्या दोरखंडांची आणि नांगरांची योग्य देखभाल न केल्यामुळे पहाटे चारच्या सुमारास आलेल्या पुराच्या तीव्र प्रवाहाने या बार्जेस सुटल्या. ‘एमव्ही अल सुभानी’ बार्ज म्हाप्रळ-आंबेत पुलाखालून वाहत जाऊन खाडीकिनारी अडकली, तर ‘एमव्ही दुलदुल’ आणि ‘एमव्ही झोया’ या दोन बार्जेस पुलाला धडकल्या. या धडकेमुळे पुलाचे मोठे नुकसान झाले असून, पुलावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला होता.

या प्रकरणाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आणि माणगावच्या उपविभागीय अभियंत्यांनी या प्रकाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता ओंकार अशोक शिरगावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मंडणगड पोलिसांनी बार्ज मालक रशाद मुजावर याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणा दाखवल्यामुळे हे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेमुळे म्हाप्रळ-आंबेत पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *