मंडणगड: रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आदर्श प्रशालेचा पुरस्कार प्राप्त गांधी चौक जि.प. मराठी शाळेची संरक्षक भिंत यंदाच्या पावसाळ्यात सलग दुसऱ्यांदा कोसळल्याची घटना घडली आहे. गेल्या वर्षीही ही भिंत कोसळली होती, तेव्हा प्रशासनाने केवळ चिऱ्यांचा वापर करून तिची डागडुजी केली होती. परिसरातील नागरिकांनी चिऱ्यांच्या भिंतीऐवजी सिमेंट काँक्रीटची पक्की भिंत उभारण्याची वारंवार मागणी करूनही नगरपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
१० जुलै रोजी नगरपंचायत विरोधी गट नेते विनोद जाधव, नगरसेवक आदेश मर्चंडे, निलेश सापटे, वैशाली रेगे, योगेश जाधव तसेच ग्रामस्थ राजाराम लेंडे, भुपाल कामेरीकर, साईराज सावंत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मर्चंडे आणि पालकांनी घटनास्थळी पाहणी करून काँक्रीटची संरक्षक भिंत उभारण्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. यावेळी प्रतिक्रिया देताना विनोद जाधव यांनी, नगरपंचायतीने सत्तेचा वापर करून सोयीनुसार काम न करता शासन निर्णयानुसार काम करावे, असे नम्रपणे सूचित केले. या कामासाठी निधीची आवश्यकता असल्यास तो उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. दरम्यान, स्विकृत नगरसेवक प्रविण जाधव यांनी, संरक्षक भिंतीच्या वरील भागातील गटार तुंबल्यामुळे पाणी झिरपून भिंत कोसळल्याचे स्पष्ट केले असून, यावर आता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.
