पाचल/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यातील पूर्व भागात अप्पर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याबाबतची मागणी जोर धरत असताना, या कार्यालयासाठी पाचल हे ठिकाण सर्वात सक्षम आणि सोयीचे असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासकीय मुख्यालय निश्चित करताना नागरिकांची सोय, दळणवळणाची उपलब्धता आणि सेवांची व्याप्ती हे निकष महत्त्वाचे मानले जातात. या निकषांवर पाचल हे गाव रायपाटणच्या तुलनेत अधिक सरस ठरत असल्याचे जाणकार आणि स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
पाचल हे परिसरातील अनेक गावांसाठी अनेक वर्षांपासूनचे प्रमुख व्यापारी, शैक्षणिक आणि सेवा केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे उपलब्ध असलेल्या बँका, पोस्ट कार्यालय, आरोग्य सुविधा, महा-ई-सेवा केंद्र आणि कृषी सेवा केंद्रांमुळे परिसरातील नागरिक दैनंदिन कामांसाठी पाचलवर अवलंबून असतात. महसूल विभागाशी संबंधित कामांसाठी नागरिकांची ही ये-जा सातत्याने होत असल्याने, येथे प्रशासकीय कार्यालय झाल्यास नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.
दुसरीकडे दळणवळणाचा विचार करता, पाचल हे एस.टी. बससेवा आणि खासगी वाहतुकीच्या माध्यमातून अनेक मार्गांशी जोडलेले आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना येथे पोहोचणे सुलभ होते. रायपाटण या गावाची तुलना करता तिथे व्यापारी आणि प्रशासकीय सेवांची उपलब्धता मर्यादित आहे. अनेक शासकीय आणि दैनंदिन गरजांसाठी रायपाटण परिसरातील नागरिकांनाही पाचलचाच आधार घ्यावा लागत असल्याचे वास्तव आहे.
प्रशासकीय मुख्यालय हे केवळ भौगोलिक स्थानावर ठरू नये, तर तिथे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधा आणि भविष्यातील प्रशासकीय विस्ताराची क्षमता विचारात घेणे आवश्यक आहे. पाचलमध्ये आधीच पायाभूत सुविधांची उपलब्धता असल्याने, येथे कार्यालय सुरू करणे प्रशासकीयदृष्ट्याही सोयीचे ठरेल. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करता, पाचल हे ठिकाण अप्पर तहसीलदार कार्यालयासाठी सर्वात योग्य असल्याचे मत जनसामान्यांतून व्यक्त होत आहे. प्रशासनाने या वस्तुस्थितीचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.




