सातारा: फलटण तालुक्यातील खामगाव येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत किसन पिसुरड्या शिंदे (वय ४८), पत्नी गंगुबाई पिसुरड्या शिंदे (वय ४६), मुलगा सचिन पिसुरड्या शिंदे (वय २६) आणि मुलगी आरती पिसुरड्या शिंदे (वय २२) या चौघांचा समावेश आहे. खामगाव येथील खाजगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ शिंदे कुटुंब वास्तव्यास होते.
बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास किसन शिंदे घराबाहेर जात असताना त्यांना घराबाहेर पडलेल्या विद्युत वाहिनीचा स्पर्श झाला आणि त्यांना तीव्र विजेचा झटका बसला. त्यांना वाचवण्यासाठी धावलेल्या पत्नी, मुलगा आणि मुलगी अशा एकापाठोपाठ एकाला विजेचा तीव्र धक्का बसला. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही एकमेकांना चिकटल्याने काही सेकंदांतच या संपूर्ण कुटुंबाचा जागीच दुर्दैवी अंत झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण फलटण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. घराबाहेरील विद्युत वाहिनीमध्ये वीजप्रवाह नेमका कसा आणि कुठून आला, तसेच यामध्ये महावितरणचा निष्काळजीपणा आहे का, याचा सखोल तपास आता फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. एकाच घरातील चार सदस्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
