संगमेश्वर पोलिसांची धडक कारवाई: अंत्रवलीत गांजा ओढणाऱ्या दोन तरुणांना रंगेहात पकडले

Gramin Varta
328 Views

संगमेश्वर : अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला मुक्त करण्यासाठी संगमेश्वर पोलिसांनी कंबर कसली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, मंगळवारी मध्यरात्री अंत्रवली परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत गांजा सेवन करणाऱ्या दोन तरुणांना रंगेहात ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

मंगळवार १४ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री १२:४५ च्या सुमारास, अंत्रवली येथील मालपवाडी परिसरात दोन तरुण संशयास्पद रितीने थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हे तरुण तिथे गांजाचे सेवन करत असल्याची माहिती मिळताच, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.सापळा रचून पोलिसांनी दोघांनाही जागेवरच पकडले.दिपेश छाया कदम (वय २५, रा. चांभार मोहल्ला, कसबा, ता. संगमेश्वर),माज अब्दुल पटेल (वय २०, रा. उभा मोहल्ला, कसबा, ता. संगमेश्वर)

पोलिसांनी केलेल्या या कारवाईत आरोपींकडून गांजा ओढण्यासाठी वापरली जाणारी २,५०० रुपये किमतीची चिलीम आणि एक लायटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ५८/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या (NDPS Act) कलम ८(क), २७ आणि २९ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

ही धडक कारवाई संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोलगे, पोलीस कर्मचारी विनय मनवल, चेतन उत्तेकर व वानरे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *