लोटे : कोकणात पावसाने अद्याप हजेरी न लावल्याने पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून आता त्याचा थेट फटका औद्योगिक क्षेत्राला बसू लागला आहे. राज्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या खेड तालुक्यातील लोटे-परशुराम एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठा जवळपास ठप्प झाल्याने अनेक उद्योग अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, लोटे एमआयडीसीतील सर्वात मोठी कंपनी असलेल्या घरडा केमिकल्सला गेल्या तीन दिवसांपासून आपले सर्व उत्पादन प्रकल्प बंद ठेवावे लागले आहेत.
जून महिना संपत आला तरी कोकणासह कोयना धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी कोयना धरणातील जलसाठा झपाट्याने घटला असून त्याचा परिणाम वाशिष्ठी नदीसह संपूर्ण परिसरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. कोयना प्रकल्पातील चारही टप्प्यांतील एकूण १,९६० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती बंद ठेवावी लागली असून केवळ पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक असलेला मूलभूत टप्पा सुरू ठेवण्यात आला आहे.
पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाल्याने घरडा केमिकल कंपनीसमोर उत्पादन प्रक्रिया सुरू ठेवणे अशक्य बनले. त्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने तातडीने सर्व युनिटमधील उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम हजारो कामगार, कंत्राटी कर्मचारी आणि उद्योगाशी निगडित विविध व्यवसायांवर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लोटे एमआयडीसीत १९८९ मध्ये सुरू झालेल्या घरडा केमिकल कंपनीच्या ३६ वर्षांच्या इतिहासात प्रथमच पाण्याअभावी सर्व प्लांट बंद ठेवण्याची वेळ आली असल्याची माहिती कंपनीचे ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी अनिल भोसले यांनी दिली. त्यामुळे या परिस्थितीची गंभीरता अधिक अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, एमआयडीसीतील इतर मोठे आणि मध्यम उद्योगही पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करत आहेत. अनेक कंपन्यांकडे केवळ एक-दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. पुढील २४ ते ४८ तासांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आणखी अनेक कंपन्यांना उत्पादन बंद करण्याची वेळ येऊ शकते.
लोटे औद्योगिक वसाहतीत रासायनिक, औषधनिर्माण, रंगनिर्मिती आदी क्षेत्रातील शेकडो उद्योग कार्यरत आहेत. या उद्योगांना दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र, पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने उद्योग व्यवस्थापनासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
कंपन्यांमधील सध्या सुरू असलेल्या बॅच पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात असल्याची माहिती रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष प्रशांत पटवर्धन यांनी दिली.
पाणीटंचाईच्या वाढत्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी प्रशासन आणि राज्य सरकारकडे तातडीने पर्यायी जलस्रोत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
उद्योगमंत्र्यांच्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या औद्योगिक वसाहतीतच अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता सरकार आणि संबंधित यंत्रणा या अभूतपूर्व संकटावर कोणता मार्ग काढतात, याकडे उद्योग क्षेत्रासह हजारो कामगारांचे लक्ष लागले आहे.
