Category: बातम्या

  • खेड : गावठी बॉम्बचा स्फोट; १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

    खेड : गावठी बॉम्बचा स्फोट; १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

    खेड : तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे बुधवारी सायंकाळी गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात शिकारीसाठी स्फोटक ठेवण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

    या स्फोटात प्रणव सुरेश येसरे (वय १२) हा मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे हलविण्यात आले आहे.

    सायंकाळच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून श्वान पथकाच्या मदतीने तपास करण्यात येत आहे.

    पोलिसांकडून गावातील नागरिकांची चौकशी सुरू असून संबंधित स्फोटक नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले होते, याचा तपास सुरू आहे. शिकारीसाठी गावठी बॉम्बचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

    या घटनेनंतर मुरडे गोठलवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

  • परशुराम घाटात केमिकलचा टँकर उलटून भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

    परशुराम घाटात केमिकलचा टँकर उलटून भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

    चिपळूण: मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या परशुराम घाटात आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. रसायनाने (केमिकल) भरलेला एक भरधाव टँकर घाटातून खाली उतरत असताना अचानक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. नियंत्रण सुटल्याने हा टँकर उलटून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात टँकर चालकाचा गाडीखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाटातून हा टँकर चिपळूणच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, टँकर पलटी झाल्यानंतर चालक गाडीच्या केबिनखाली पूर्णपणे दावला गेला आणि त्याचा जागीच प्राण गेला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि चिपळूण नगर परिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्याचे आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

    या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक संथ गतीने पूर्ववत केली. परशुराम घाटातील या थरारक अपघातामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

  • आंबा घाटातील वाहतूक अखेर सुरळीत; गॅस टँकर दुर्घटनेनंतर प्रशासनाला यश

    आंबा घाटातील वाहतूक अखेर सुरळीत; गॅस टँकर दुर्घटनेनंतर प्रशासनाला यश

    देवरुख : आंबा घाटातील गॅस टँकर अपघातानंतर बंद करण्यात आलेली वाहतूक अखेर पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे. प्रशासन, पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून वाहनचालकांनीही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

    आंबा घाटात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने बुधवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली होती. या अपघातात चालक महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरमधील गॅसगळतीचा संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद केली होती.

    अपघातग्रस्त टँकरमधील गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल, महामार्ग विभाग तसेच संबंधित तांत्रिक पथकाने रात्रभर घटनास्थळी तळ ठोकून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
    सुरक्षा उपाययोजना पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने आंबा घाटातील वाहतूक पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोकण आणि कोल्हापूरदरम्यानची वाहतूक पूर्ववत झाली असून अनेक तास अडचणीत सापडलेल्या वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.

  • राजापूर: कोदवली येथे कौटुंबिक वादातून २७ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

    राजापूर: कोदवली येथे कौटुंबिक वादातून २७ वर्षीय तरुणाची गळफास लावून आत्महत्या

    राजापूर: तालुक्यातील कोदवली मांडवकर खालचीवाडी येथे एका २७ वर्षीय तरुणाने कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून राजापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार चंद्रकांत मांडवकर (वय २७, रा. कोदवली मांडवकर खालचीवाडी, ता. राजापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास ओंकार हा घरात असताना कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादाच्या रागातून आणि दारूच्या नशेत त्याने राहत्या घराच्या किचनच्या बाजूला असलेल्या पडवीत जाऊन लोखंडी बारला साडीच्या काठाने गळफास लावून घेतला.

    हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून ओंकारला उपचारासाठी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासत पूर्वीच मृत घोषित केले. या घटने संदर्भात २७ मे २०२६ रोजी मध्यरात्री १:१४ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ नुसार नोंद केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

  • राजापुरात डॉक्टरला ब्लॅकमेल करून २५ हजारांची खंडणी उकळली

    राजापुरात डॉक्टरला ब्लॅकमेल करून २५ हजारांची खंडणी उकळली

    नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या लांजा साडवलीतील तरुणावर गुन्हा दाखल

    राजापूर: सोशल मीडियावर शेअर केलेले नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील एका ३१ वर्षीय डॉक्टरला ब्लॅकमेल करत २ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भीतीपोटी २५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केल्यानंतर, अखेर संबंधित डॉक्टरने पोलिसांत धाव घेतली असून लांजा तालुक्यातील साडवली येथील एका तरुणाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वडदहसोळ म्हादये येथील रहिवासी असलेले फिर्यादी अक्षय गिरीधर म्हादये (वय ३१) हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सन २०२५ मध्ये (नक्की तारीख माहीत नाही) त्यांच्या ‘Dr_Akshay_mhadye’ या इन्स्टाग्राम आयडीवर नेहा बिराडी (रा. गोळवशी) हिच्या ‘neha_biradi_03’ या इन्स्टाग्राम आयडीवरून संपर्क झाला होता. त्यानंतर तिच्या सांगण्यावरून फिर्यादी डॉक्टरने स्वतःचे काही नग्न फोटो तिच्यासोबत शेअर केले होते. २२ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० ते १०:०५ वाजण्याच्या सुमारास, या जुन्या फोटोंचा गैरवापर करून आरोपीने डॉक्टरला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

    आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे (वय ३०, रा. साडवली, ता. लांजा) याने आपल्या व्हॉट्सॲप नंबरवरून फिर्यादी डॉक्टरच्या व्हॉट्सॲपवर ते नग्न फोटो पाठवले आणि हे फोटो इतरत्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. हे फोटो सोशल मीडियावरून हटवण्यासाठी आणि कोणाला न दाखवण्यासाठी आरोपी सिद्धेश याने डॉक्टरकडे एकूण २ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली. या गंभीर धमकीमुळे पुरते घाबरलेल्या फिर्यादी डॉक्टरने तातडीने गुगल पे (Google Pay) द्वारे २५ हजार रुपये आरोपी सिद्धेश आंबरे याच्या खात्यावर ट्रान्सफर केले.

    मात्र, मानसिक त्रास आणि पैशांची मागणी थांबत नसल्याने अखेर फिर्यादी डॉक्टरने २७ मे २०२६ रोजी रात्री ११:२१ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी सिद्धेश जयवंत आंबरे याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १५१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८(२) (खंडणी), ३५१(२) (गुन्हेगारी धमकी) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) कलम ६६(ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास राजापूर पोलीस करत आहेत.

  • ‘आज तुला संपवणारच’; पोलीस तक्रारीचा राग धरून मावळंगे येथील वाडी प्रमुखावर लोखंडी फरशीने हल्ला; बाप-लेकावर गुन्हा दाखल

    ‘आज तुला संपवणारच’; पोलीस तक्रारीचा राग धरून मावळंगे येथील वाडी प्रमुखावर लोखंडी फरशीने हल्ला; बाप-लेकावर गुन्हा दाखल

    रत्नागिरी: पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा आणि वाडीचे प्रमुख असल्याचा राग मनात धरून एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या घरात घुसून धारदार लोखंडी फरशीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी तालुक्यातील मावळगे येथे घडली आहे. या हिंसक प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात बाप-लेकाविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मावळगे वरची गुळेकरवाडी येथील रहिवासी विलास बापू वारीसे (वय ५३) हे २७ मे २०२६ रोजी सकाळी ९:५० वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी एकटेच होते. यावेळी जुन्या वादातून आरोपी अमर शंकर बंडबे हा हातात धारदार लोखंडी फरशी घेऊन त्यांच्या घरात घुसला. ‘माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार का दिलीस, आज तुला संपवणारच’ असे म्हणत त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादी वारीसे यांनी त्याला आदल्या दिवशी केलेल्या शिवीगाळीचा जाब विचारला असता, आरोपी अमर याने हातातील लोखंडी फरशी उगारून त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

    हा वाद सुरू असतानाच काही वेळात अमरचा मुलगा सर्वेश अमर बंडबे हा देखील हातात धारदार लोखंडी फरशी घेऊन तेथे पोहोचला. ‘तू वाडीचा प्रमुख आहेस, तू संपलास की बाकी सर्वजण बरोबर घाबरतील’ असे म्हणत त्याने वारीसे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसरीकडे, ‘तू एकाएकाला संपव, मी तुझ्या पाठीशी आहे’ असे म्हणत आरोपी वडिलांनी आपल्या मुलाला चिथावणी दिली. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

    याप्रकरणी जखमी फिर्यादी विलास वारीसे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. २७ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०५ वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपी अमर बंडबे आणि सर्वेश बंडबे यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांन्वये (ज्यामध्ये गृहअतिक्रमण, मारहाण, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांचा समावेश आहे) गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

  • खारेपाटण-गगनबावडा मार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक दरीत पलटी ; चालकावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा

    खारेपाटण-गगनबावडा मार्गावर गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक दरीत पलटी ; चालकावर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा

    राजापूर: खारेपाटण ते गगनबावडा मार्गावरील मौसम गावाजवळ असलेल्या उताराच्या धोकादायक वळणावर एचपी गॅस कंपनीचा सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, ट्रकमधील अनेक रिकामे सिलेंडर थेट दरीत कोसळून मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, खारेपाटण (ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग) येथील रहिवासी यशवंत चंद्रकांत रायबागकर (वय ४५) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. आरोपी चालक बिरा भुजा माने (रा. रेडी, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) हा आपल्या ताब्यातील एचपी गॅस कंपनीचा सिलेंडरने भरलेला ट्रक (क्र. एम.एच. ०९ ई.एम. ३४४२) घेऊन खारेपाटण येथून गगनबावडा मार्गे हजारवाडी, कोल्हापूरच्या दिशेने जात होता. २६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास हा ट्रक राजापूर तालुक्यातील मौसम गावच्या हद्दीतील उतारावरील वळणावर आला असता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक उजव्या बाजूला पलटी झाला.

    हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकची उजवी बाजू पूर्णपणे चेपली गेली असून समोरील काच फुटून केबीनचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ट्रकच्या पाठीमागील हौद्यात असलेले रिकामे गॅस सिलेंडर बाहेर पडले आणि खाली दरीत कोसळले. या अपघातात वाहनाचे व सिलेंडरचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर २७ मे २०२६ रोजी दुपारी २:४५ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी चालक बिरा भुजा माने याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, ३२४(१), (२) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या तरतुदीनुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

  • राजापुरात जागेच्या वादातून चौघांना बांबू आणि पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

    राजापुरात जागेच्या वादातून चौघांना बांबू आणि पाईपने मारहाण; तिघांवर गुन्हा

    राजापूर: आईच्या मालकीच्या जागेच्या वारस हक्काच्या वादातून राजापूर तालुक्यातील मांडरुळ गणेशवाडी येथे एकाच कुटुंबातील चौघांना लाकडी बांबू आणि पाईपने अमानुष मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नालासोपारा येथील महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून तिघा नातेवाईकांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्व येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी पम्मी फलचंद जयस्वार (वय ४३) यांच्या आई पार्वती मासये यांच्या मालकीच्या जागेच्या वारस तपासावरून त्यांच्या नातेवाईकांसोबत वाद सुरू आहेत. फिर्यादी पम्मी या त्यांची आई पार्वती, मुलगा मेघनाथ आणि बहीण पुष्पा यांच्यासोबत राजापूर येथे जात असताना, २५ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास तिवंडमाळ येथे आरोपी वैभव मासये याने त्यांना पाहून अश्लील शिवीगाळ केली. ‘तुम्ही परत मुंबईला जिवंत जाणार नाही’ अशी धमकी देत त्याने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वक्तव्य केले.
    यानंतर २६ मे २०२६ रोजी सकाळी ७:२० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पम्मी या आपल्या आई, मुलगा आणि बहिणीसह आरोपी मंगल बाबुलाल हडाळे यांच्याकडे आधारकार्ड आणण्यासाठी मांडरुळ गणेशवाडी येथे गेल्या होत्या. त्यावेळी तेथे असलेल्या आरोपी मानसी वैभव मासये हिने फिर्यादी पम्मी, त्यांचा मुलगा मेघराज, बहीण पुष्पा गणेश पुजारी आणि आई पार्वती सीताराम मासये यांना लाकडी बांबू आणि पाईपने बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात पुष्पा पुजारी, पार्वती मासये, पम्मी जयस्वार आणि मेघराज जयस्वार हे चौघेही गंभीर जखमी झाले आहेत.

    या संपूर्ण प्रकरणी २७ मे २०२६ रोजी सकाळी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी मंगल बाबुलाल हडाळे (वय ५०), मानसी वैभव मासये (वय २३) आणि वैभव मासये (सर्व रा. मंदरुळ गणेशवाडी, राजापूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कायदा कलम ७९, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील अधिक तपास करत आहेत.

  • रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी; ९० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांचा तपास पूर्ण

    रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी; ९० टक्क्यांहून अधिक गुन्ह्यांचा तपास पूर्ण

    रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गुन्हे तपासाच्या क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय आणि प्रभावी कामगिरी केली असून प्रलंबित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी राखण्यात यश मिळविले आहे. जिल्हा पोलीस दलामार्फत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा दर्जेदार, परिणामकारक आणि वेळेत तपास करण्यावर विशेष भर दिला जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकातून समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च २०२५ ते ०१ एप्रिल २०२६ या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यात भाग १ ते ५ अंतर्गत एकूण १,७७७ गुन्हे दाखल झाले होते. पोलीस दलाने अत्यंत गतीने कारवाई करत यातील तब्बल ९२.३५% गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला आहे. सध्या या विभागातील केवळ १३६ गुन्हे प्रलंबित असून हे प्रमाण अवघे ७.६५% इतके कमी आहे.

    दुसरीकडे, दारुबंदी गुन्ह्यांसह भाग ६ अंतर्गत जिल्ह्यात एकूण २,५५२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. यापैकी ९६.७५% गुन्ह्यांचा तपास पूर्ण करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. या भागातील केवळ ८३ गुन्हे सध्या प्रलंबित असून प्रलंबित गुन्ह्यांचे हे प्रमाण केवळ ३.२५% आहे. पोलीस दलाची ही कामगिरी अत्यंत समाधानकारक आणि कौतुकास्पद मानली जात आहे.

    या सर्व गुन्ह्यांच्या तपासावर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांचे प्रभावी पर्यवेक्षण होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व तपासी पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या जलद, सखोल व गुणवत्तापूर्ण तपासामुळेच हे यश साध्य झाले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जलद न्याय मिळावा, गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट व्हावी यासाठी जिल्हा पोलीस दल सातत्याने कटिबद्ध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

  • नमन लोककला संस्थेच्या गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे

    नमन लोककला संस्थेच्या गुहागर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी जगन्नाथ शिंदे

    गुहागर (उदय दणदणे): नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र (अखंड भारत) संलग्न गुहागर तालुका शाखेची आगामी २०२६-२९ या त्रैवार्षिक कालावधीसाठीची नूतन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी वरवेली येथील जगन्नाथ शिंदे यांची तर सचिवपदी असगोली येथील प्रमोद घुमे यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भातील वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच श्री हसलाई ग्रामदेवी मंदिर वरवेली येथे अनिल रांजाणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि संदीप कानसे, उदय दणदणे, अमित काताळे, संजय कळंबाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेत मागील इतिवृत्तासह एप्रिल २०२१ ते मार्च २०२६ या पाच वर्षांच्या कालावधीचा जमा-खर्च अहवाल वाचून मंजूर करण्यात आला. त्यानंतर संस्थेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त सक्रिय सदस्य जोडण्याच्या उद्देशाने वाडदई वरची वाडी सभागृह येथे विशेष बैठकीचे आयोजन करून नव्या कार्यकारिणीवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

    या जाहीर झालेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये खजिनदार म्हणून शांताराम शिंदे (वरवेली), उपाध्यक्षपदी विनायक कांबळे (वाडदई) व सुरेश कदम, तर उपसचिव म्हणून सुधीर टाणकर (पालपेणे) यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून संदीप गोरीवले, संतोष घुमे, नरेश रांजाणे, जनार्दन आंबेकर, दत्ताराम चांदिवडे, यशवंत जोयशी, विठ्ठल काताळे, शशिकांत कांबळे, सुधाकर गोणबरे, प्रवीण बारगोडे, संजय गावणंग यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मुंबई समन्वयक म्हणून सुधाकर मास्कर, संदीप कानसे, अनिल रांजाणे, संजय कळंबाटे तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून संतोष घुमे यांची नियुक्ती निश्चित झाली आहे.

    गुहागर तालुका शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतातून माजी कार्यकारिणीचे आभार व्यक्त केले. भविष्यातही आजी-माजी कार्यकारिणी एका विचारधारेने काम करून स्थानिक नमन कलाकारांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. आगामी काळात तालुक्यातील नमन कलाकारांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी गुहागर तालुका शाखेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाईल. तसेच येत्या जुलै महिन्यात तालुक्यातील जास्तीत जास्त गरजू नमन कलाकारांना शासकीय कलाकार पेन्शन प्राप्त करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान आणि सभेला तालुक्यातील नमन कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.